सर्दीमुळे का बसतो गळा? काय आहे वैज्ञानिकांचे कारण? जाणून घ्या
सर्दी किंवा हिवाळ्यात आवाज बसणे ही स्वरयंत्रांवरील सूज आणि कफाच्या परिणामामुळे होते. योग्य विश्रांती, पाणीपान आणि काळजी घेतल्यास आवाज लवकर पूर्ववत होतो.
हिवाळ्यात किंवा सर्दी झाल्यावर अनेकदा आपला आवाज अचानक बसतो, भरडा किंवा कर्कश वाटतो. जणू आपल्याच गळ्यातून दुसऱ्याचाच आवाज निघतोय, अशी भावना येते. हे काही साधं नाही, तर शरीरात चालणाऱ्या एका वैज्ञानिक प्रक्रियेचा परिणाम असतो. सर्दी किंवा व्हायरल इन्फेक्शन झाल्यावर त्याचा परिणाम फक्त नाक किंवा गळ्यावरच मर्यादित राहत नाही, तर आवाज निर्माण करणाऱ्या वोकल कॉर्ड्स (स्वरतंत्री) वरही होतो. गळ्यात असणाऱ्या या स्वरतंत्रींच्या कंपनामुळे आवाज तयार होतो.
परंतु जेव्हा त्यांना सूज येते, ज्याला वैद्यकीय भाषेत लॅरिंजायटिस (Laryngitis) म्हणतात, तेव्हा त्या जाड आणि कठीण बनतात. परिणामी त्यांचा कंपनाचा वेग कमी होतो आणि आवाज भरडा, जड किंवा बसलेला वाटतो. सर्दीच्या काळात गळ्यात कफ साचतो. हा कफ स्वरयंत्रांवर थरासारखा बसतो आणि त्यांना व्यवस्थित कंपन होऊ देत नाही. त्यामुळे आवाजात खरखर, बदललेला स्वर किंवा ‘खरडल्यासारखी’ भावना येते. सर्दी गेल्यानंतरही जर कफ पूर्णपणे निघून गेला नाही, तर आवाज पूर्ववत होण्यासाठी अजून वेळ लागू शकतो. सर्दीमध्ये लोक वारंवार खोकून किंवा गळा साफ करून आराम मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण असं केल्याने उलट स्वरयंत्रांवर अधिक ताण येतो. त्यामुळे त्यांच्यात ताण, सूज आणि जखम होऊ शकते, ज्यामुळे आवाज आणखी खराब होतो. स्वरयंत्र सूजल्यावर त्यांची जाडी आणि वजन वाढते. हे अगदी गिटारच्या जाड तारांसारखं असतं. जाड तारांमधून नेहमीच खोल आणि जड आवाज येतो. त्याचप्रमाणे सूज आलेल्या स्वरयंत्रांचा कंपन मंदावतो आणि त्यामुळे आवाज खोल, भारी किंवा बसल्यासारखा वाटतो.
दिवसातून पुरेसे पाणी प्या. गरज असल्यास ह्यूमिडिफायर वापरा, ज्यामुळे गळ्यातील ओलावा टिकतो आणि सूज कमी होते.
शक्य तितका गळ्याला विश्रांती द्या. हळू बोलणं किंवा फुसफुसणं टाळा, कारण तेही स्वरयंत्र थकवते.
मध आणि कोमट पाण्याचा वापर करा, तो नैसर्गिक आराम देतो.
जर दोन ते तीन आठवड्यांनंतरही आवाज ठीक होत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. काही वेळा ही समस्या स्वरयंत्रावर गाठी येणे किंवा अॅसिड रिफ्लक्ससारख्या आजारांमुळेही होऊ शकते.
सारांश म्हणजे सर्दीमुळे गळा बसणे ही शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया असली, तरी योग्य काळजी घेतल्यास आवाज लवकर पूर्ववत करता येतो.