फोटो सौजन्य - Social Media
टपरीवर गर्दी करून लोक गरमागरम, तिखट-गोड पाणीपुरीचा आनंद घेताना! भारतात जिथे जाल तिथे तुम्हाला ही एक गोष्ट हमखास दिसते. पण गंमत म्हणजे या छोट्या गोल कुरकुरीत पुरीला प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. कुणासाठी ती गोलगप्पा, कुणासाठी पुचका, कुणासाठी गुपचुप, तर कुणासाठी फुल्की.
उत्तर भारत: गोलगप्पा
दिल्ली, पंजाब, जम्मू-कश्मीर या भागात पाणीपुरीला गोलगप्पा म्हणतात. इथे पीठ आणि रवा, अशा दोन प्रकारच्या पुरी वापरल्या जातात. आतमध्ये उकडलेले बटाटे, काबुली चणे, चटणी भरून त्याला पुदिन्याच्या तिखट पाण्यात बुचकळून खाल्लं जातं.
पश्चिम बंगाल व बिहार: पुचका
बंगाल आणि बिहारमध्ये याला पुचका म्हणतात. इथे पिठाच्या पुऱ्या जास्त लोकप्रिय आहेत आणि फिलिंगमध्ये काबुली मटाराचा वापर जास्त दिसतो.
महाराष्ट्र व गुजरात: पाणीपुरी
आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात ही खरी पाणीपुरी! इथली खासियत म्हणजे रगडा! म्हणजेच उकडलेल्या पांढऱ्या मटाराचं झणझणीत मिश्रण. त्यावर गोड-तिखट चटणी टाकून पुरी भरली जाते आणि पाण्यात बुचकळून दिली जाते.
उत्तर प्रदेश: पाणी के बताशे
यूपीमध्ये याचं नाव आहे “पाणी के बताशे.” कानपूर-लखनौमध्ये मिळणारे बताशे खास करून प्रसिद्ध आहेत. आलू, मटार, चटणी यांचं मिश्रण इथे चव वाढवतात.
ओडिशा, हैदराबाद: गुपचुप
ओडिशा आणि झारखंड-हैदराबादच्या काही भागात पाणीपुरीला गुपचुप म्हणतात. कारण ती तोंडात टाकताच गुपचुप विरघळून जाते! इथे आलूसोबत कच्चा कांदाही फिलिंगमध्ये घातला जातो.
मध्य प्रदेश: फुल्की
मध्य प्रदेशात मात्र हे फुल्की नावाने ओळखले जाते. नावावरूनच जाणवतं की हलकी-फुलकी स्नॅक म्हणून इथे याचा आस्वाद घेतला जातो.
पाणीपुरीच्या पाण्याचे भन्नाट फ्लेवर्स
आजकाल पाणीपुरीमध्ये पाण्याचेही अनेक फ्लेवर्स मिळतात. जिरे-पुदिना, लसूण, हिंग-इमली, कच्चं आंबट कैरीचं पाणी, गोड-तिखट चव अशा सगळ्याच प्रकारांनी हा स्नॅक देशभरात प्रिय आहे. मग नाव काहीही असो गोलगप्पा, पुचका, गुपचुप, फुल्की किंवा पाणीपुरी! या छोट्या गोल पुरीच्या एका घासाने मनाला जे समाधान मिळतं, त्याची चव मात्र सारखीच!