मुलांमध्ये हायपरटेन्शन वाढण्याची कारणं काय (फोटो सौजन्य - iStock)
अलीकडच्या काळात लहान मुलांमध्ये उच्च रक्तदाबाच्या तक्रारी वाढल्यात. उच्च रक्तदाब हा एक सायलेंट किलर आहे ज्याची लक्षणे खूप नंतर दिसतात. अशा स्थितीत लहान मुलांमध्येही त्याची लक्षणे क्वचितच सुरुवातीच्या टप्प्यात दिसून येतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीची जीवनशैली यामुळे मुलांना उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते.
डॉ. अभिमन्यू सेनगुप्ता, वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ, अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रन, पुणे म्हणाले उच्च रक्तदाब ही बहुतेकदा प्रौढांमधील एक आरोग्य समस्या मानली जाते. मात्र बदलत्या जीवनशैलीनुसार हल्ली किशोरवयीन मुलांमध्ये, या आजाराचे निदान मोठ्या प्रमाणात होत आहे. सुरुवातील लक्षणांच्या अभावामुळे अनेक प्रकरणांमध्ये निदान होत नसले तरी, उच्च रक्तदाबाचा मुलांच्या हृदय आणि महत्वाच्या अवयवांच्या कार्यांवर तसेच एकूण आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो.
मुलांमध्ये वाढते रक्तदाबाची समस्या
रक्तदाबाची समस्या वाढीला का लागली आहे
डॉ. आदित्य देशमुख, इंटर्नल मेडिसिन एक्सपर्ट, अपोलो स्पेक्टा पुणे म्हणाले की, ‘आई-वडिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास असेल, तर मुलांनाही तो होण्याचा धोका असतो. आनुवंशिकतेबरोबरच वाढलेले वजन, अयोग्य आहार, ताणतणाव हे घटक रक्तदाब वाढण्यास मदत करतात.तीन किंवा त्यापेक्षा कमी वयाची मुले प्रमाणापेक्षा अधिक वजनाची असतील, किंवा जन्मतः हृदय, फुफ्फुस किंवा अन्य गंभीर आजाराने ग्रस्त असतील तर त्यांचा रक्तदाब नियमितपणे तपासण्याची गरज असते. मूल बरंच लहान असेल तर रक्तदाबाची लक्षणं लवकर दिसून येत नाहीत. पौंगडावस्थेतील मुलांमध्ये मान, डोकेदुखी, उलटी होणे, चक्कर येणे, नाकाचा घोणा फुटून रक्तसाव होणे इत्यादी लक्षणं दिसू शकतात.’
काय आहेत कारणे
उच्च रक्तदाबाचा कुटुंबिक इतिहास नसतानाही बहुतेकदा वाढते वजन किंवा लठ्ठपणामुळे मुलं रक्तदाबासारख्या समस्येचे शिकारी ठरतात. चुकीच्या जीवनशैलीमुळे एका ठिकाणी फार काळ बसून राहण्याच्या सवयीमुळे आणि जास्त प्रमाणात खारट किंवा प्रक्रिया केलेले पदार्थांचे सेवन केल्याने मुलांना रक्तदाबाची समस्या सतावते. ही समस्या मधुमेह, झोपेचे विकार आणि रक्तातील चरबीच्या असामान्य पातळीशी संबंधित आहे तसेच यामध्ये ‘कार्डिओमेटाबॉलिक सिंड्रोम’ची लक्षणे आढळून येतात.
लक्षणे कोणती ?
कोणती लक्षणे दिसतात
बालपणातील उच्च रक्तदाब संबंधित लक्षणे बऱ्याचदा सुरुवातीच्या टप्प्यात आढळून येत नाही . काही प्रकरणांमध्ये मुलांना डोकेदुखी, चक्कर येणे, अस्पष्ट किंवा दुहेरी दृष्टी, उलट्या होणे, नाकातून रक्त येणे किंवा लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे अशी लक्षणं आढळतात.
पालकांनी अशा तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा जे त्यांच्या मुलांच्या आरोग्याचे योग्य मूल्यांकन करतील व उच्च रक्तदाबाचा धोका असल्यास त्याचा शोध घेतील. आवश्यकतेनुसार तपासणी करत वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.
काय उपचार कराल ?
जर तुमच्या मुलाला उच्च रक्तदाबाचे निदान झाले तर त्याचे उपचार हे त्याचे मूळ कारण आणि स्थितीच्या तीव्रतेवर अवलंबून असेल. उच्च रक्तदाबाच्या अनेक प्रकरणांमध्ये निरोगी आहार, नियमित शारीरिक हालचाली आणि वजन व्यवस्थापन यासारख्या जीवनशैलीतील बदलांनी रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करू शकतात. मुलाचा आहार आणि व्यायामाबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.
प्रतिबंधात्मक उपाय कोणते?
कोणते उपाय करावेत
मुलांमध्ये उच्च रक्तदाब रोखण्यासाठी, पालकांनी लहानपणापासूनच निरोगी सवयींना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. पालकांनी आणि कुटुंबातील थोरामोठ्यांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून घरातील लहान मुलांसाठी आदर्श निर्माण केला पाहिजे.
मुलांनी प्रक्रिया केलेले आणि खारट पदार्थांचे सेवन मर्यादित केले पाहिजे आणि सायकलिंग किंवा मैदानी खेळांसारख्या शारीरिक हालचालींमध्ये सहभागी व्हावे. पालकांनी त्यांच्या मुलाचे वजन निरोगी राहील याची खात्री करावी. नियमित वैद्यकीय तपासणी ही उच्च रक्तदाबाचा कौटुंबिक इतिहास असलेल्या मुलांसाठी, सुरुवातीची लक्षणे शोधण्यास मदत करू शकते. बालपण आणि पौगंडावस्थेतील अनियंत्रित उच्च रक्तदाबाचे परिणाम मुलाच्या भविष्यातील आरोग्यावर होऊ शकतो; त्यामुळे भविष्यात स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. म्हणूनच मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे, नियमित वैद्यकीय तपासणी करणे आणि उच्च रक्तदाबासारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारांना प्रतिबंध करणे ही काळाची गरज आहे.