World Mosquito Day 2024: डासांपासून होणाऱ्या आजारांवर जनजागृतीचा दिवस
दरवर्षी 20 ऑगस्ट हा दिवस जगभरात ‘जागतिक मच्छर दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट डासांमुळे होणाऱ्या रोगांबाबत जनजागृती करणे आणि त्यावर उपाययोजना करण्यावर भर देणे आहे. लहान दिसणारे डास डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारखे अनेक आजार पसरवू शकतात आणि उपचारात उशीर किंवा निष्काळजीपणामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. जागतिक स्तरावर हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना या धोक्यांची जाणीव करून देणे आणि डासांपासून बचाव करण्यासाठीच्या उपाययोजना सांगणे हा आहे.
जागतिक मच्छर दिवसची सुरुवात कशी झाली?
हा दिवस पहिल्यांदा 1897 मध्ये डॉ. रोनाल्ड रॉस यांनी शोधलेल्या मलेरिया प्रसाराच्या शोधाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जाऊ लागला. रॉस यांनी केलेल्या संशोधनात असे आढळून आले की, मादी एनाफोलीज डासांपासून मलेरिया पसरतो. त्यांच्या या शोधासाठी त्यांना वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिकही देण्यात आले. त्यांच्या या महत्त्वपूर्ण शोधानंतर, मलेरिया नियंत्रणाच्या उपाययोजनांसाठी मोठी प्रगती होऊ लागली. त्यांनंतर रोनाल्ड रॉस यांना समर्पित म्हणून हा दिवस साजरा करण्याची सुरुवात लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनने 1930 साली केली होती.
जागतिक मच्छर दिवसाचे महत्त्व
डास हा जगातील सर्वात धोकादायक कीटकांपैकी एक मानला जातो. त्यांच्या चावण्यामुळे डेंग्यू, चिकुनगुनिया, झिका विषाणू आणि मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. योग्य काळजी घेतली गेली नाही तर हे आजार जीवघेणेही ठरू शकतात. डासांमुळे होणा-या आजारांमुळे जगात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. मिळालेल्या माहितीनसार एक अहवाल समोर आला आहे. या अहवालात सांगण्यात आले आहे की, 2010 साली आफ्रिकेत सर्वाधिक मृत्यू हे डासांच्या चावण्यामुळे झाले होते. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना या धोकादायक आजारांबद्दल जागरूक करणे आणि डासांपासून स्वतःचे संरक्षण करण्याचे मार्ग सांगणे हा आहे.
डासांमुळे होणा-या धोक्यांसह, हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे की हे धोकादायक कीटक आपल्या परिसंस्थेच्या सुरळीत चालण्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांना पूर्णपणे काढून टाकल्याने पर्यावरणीय संतुलन बिघडू शकते, ज्यामुळे अनेक प्रकारचे धोके निर्माण होऊ शकतात. म्हणून, त्यांना नष्ट करण्याऐवजी, शास्त्रज्ञ त्यांच्या पुनरुत्पादनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांच्यामुळे होणारे रोग टाळण्यासाठी उपायांवर लक्ष केंद्रित करण्याची शिफारस करतात.
जागतिक मच्छर दिवस 2024 थीम
यंदाच्या 2024 मध्ये डासांपासून संरक्षण आणि जागरूकता या उद्देशावर भर दिला जात आहे. सरकारी आरोग्य संस्था स्वयंसेवी संस्था आणि आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना विविध कार्यक्रमांद्वारे डास प्रतिबंधक उपाय आणि डासांपासून होणाऱ्या रोगांचे व्यवस्थापन यावर चर्चा करत आहेत.