अमरावतीच्या 3 प्रकल्पांत 100 टक्के जलसाठा
अमरावती : जुलै महिन्यात सरासरीच्या 108 टक्के पाऊस झाल्यानंतरही जिल्ह्यातील लघू प्रकल्पातील पाणीसाठ्याची स्थिती विशेष सुधारलेली नाही. अचलपूर पाटबंधारे विभागातील 26 पैकी 3 प्रकल्प 100 टक्के भरले असून, 3 प्रकल्पांमध्ये त्याखालोखाल जलसाठा झाला आहे. 20 प्रकल्पांमध्ये 50 टक्केही पाणीसाठा होऊ शकलेला नाही.
अप्परवर्धा सिंचन मंडळाच्या 3 लघुप्रकल्पांत 100 टक्के जलसाठा झाला असून, 20 प्रकल्पांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अचलपूर मध्यम व लघु पाटबंधारे विभागात एकूण 26 लघुप्रकल्प आहेत. त्यापैकी धारणीतील मांडवा, नांदुरी तसेच चांदूरबाजार तालुक्यातील चारघड लघुप्रकल्पातील पाणीसाठा 100 टक्के झाला आहे. नांदगाव खंडेश्वरमधील पिंपळगाव 80 टक्के वरुडमधील लोणी धवलगिरी 50 टक्के व धारणी तालुक्यातील लवादा लघुप्रकल्पात 92 टक्के जलसाठा झाला आहे.
हेदेखील वाचा : नीरा खोऱ्यातील सर्व धरणे फुल्ल; नदीला पूरस्थिती, ब्रिटिशकालीन पुलाला टेकले पाणी
उर्वरित 20 लघुप्रकल्पांना अजूनही दमदार पावसाची आस आहे. तिवसा तालुक्यातील जळका प्रकल्पात शून्य टक्के साठा असून, वरुडमधील बेलसावंगीमध्ये 8, धारणीतील साद्राबाडी 10, सावलीखेडा 0.93, गंधेरी 14 तर गावलाडोह प्रकल्पात 16 टक्केच पाणीसाठा होऊ शकला.
पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस
पुणे जिल्ह्यात नीरा नदी खोऱ्यात असलेली चारही धरणे आता पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे नीरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात सोडण्यात येत आहे. त्या पाण्यामुळे नीरा नदीला पूरसदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. नीरा नदीकाठी असलेला दत्त घाट पाण्याखाली गेला आहे. तर नीरा नदीकाठच्या घरांमध्ये पाणी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याबरोबर नीरा नदीकाठच्या ब्रिटिशकालीन पुलाला हे पाणी टेकले आहे. तर पाटबंधारे विभागाच्या वतीने नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.