File Photo : Nira River
नीरा : नीरा नदी खोऱ्यात असलेली चारही धरणे आता पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे नीरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात सोडण्यात येत आहे. त्या पाण्यामुळे नीरा नदीला पूरसदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. नीरा नदीकाठी असलेला दत्त घाट पाण्याखाली गेला आहे. तर नीरा नदीकाठच्या घरांमध्ये पाणी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याबरोबर नीरा नदीकाठच्या ब्रिटिशकालीन पुलाला हे पाणी टेकले आहे. तर पाटबंधारे विभागाच्या वतीने नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये मागील तीन आठवड्यापासून संततधार पाऊस पडत आहे. डोंगर माथ्यावर जोरदार पाऊस होत असल्याने हे पाणी निरा खोऱ्यात असलेल्या धरणांमध्ये साठत आहे. त्यामुळे नीरा खोऱ्यातील चारही धरणे आता तुडुंब भरली आहेत. या धरणांमधून नीरा नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. नीरा नदीला महापूराची स्थिती निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे वीरधरणांमधून नीरा नदी पात्रामध्ये आज दिवसभर 43 हजार क्युसेक प्रति सेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत होते. दिवसभर याच प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने निरा नदी काठच्या गावांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी नीरा नदी खोऱ्यातील भाटघर धरण, निरा देवघर धरण, तुडुंब भरले आणि या धरणाच्या स्वयंचलित दरवाजामधून नीरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला.
तत्पूर्वीच निरा नदीमध्ये वीर धारणामधून पंधरा हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येत होते. त्यात या दोन्ही धरणातून येणाऱ्या पाण्याची भर पडली आणि वीरधरणांमधून पाणी सोडण्याच्या प्रमाणात मोठी वाढ करण्यात आली. गेली दोन वर्षे निरा नदीला कोणत्याहीप्रकारे पूर आला नव्हता. मात्र, मागील पंधरा दिवसापासून नीरा नदीचे पाणी थांबलं नाही.