पुरोगामी पुण्यात 207 'वैष्णवीं'नी संपवले जीवन..! छळ 'ती'चा संपतच नाही...
पुणे /अक्षय फाटक : कुटुंबियांचा विरोध पत्कारून प्रेम विवाह करणाऱ्या आणि विवाह सोहळ्यात पतीची आणि त्याच्या कुटूंबाची ‘बडदास्त’ सांभाळत कोट्यवधी रुपयांची मुक्त उधळ (हुंडाच) दिल्यानंतरही असाह्य जाच सहन करत शेवटी जीवन संपवणाऱ्या “वैष्णवी”च्या मृत्यूने राज्यभरात हुंडा बळीविरोधात संतापाची लाट पसरली आहे. पण, पुरोगामी पुण्यात पती आणि सासरच्या जाचाला, त्यांच्या टोमन्यांना, हुंड्यासाठी, अनावश्यक डिमांड आणि घर कामावरून बोलणी खात तबल २०७ “वैष्णवीं”नी आपले जीवन संपवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
पुरोगामी, पुढारलेल्या आणि २१ व्या शतकातील पुण्यातील हे भयावह वास्तव आहे. विशेष म्हणजे, वर्षाला साधारण तीनशेहून अधिक गुन्हे हे विवाहितांच्या छळाचे गुन्हे नोंद होत आहेत. त्यामुळे अश्या प्रकरणात कडक शासन होणे, हेच पहिले पाऊल या घटनांना रोखण्यासाठी असेल असे म्हणले जात आहे.
पुण्या-पिंपरी-चिंचवडसारख्या प्रगत व झपाट्याने वाढणाऱ्या शहरातील हे विदारक चित्र आजच्या सुशिक्षीत म्हणविणार्या जमाजाचे वास्तव दर्षवत आहे. महिला आज पुरूषाच्या खांद्याला-खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात कर्तव्य बजावत आहेत. शासन तसेच विविध सामाजिक संघटनांकडून महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम घेऊन त्यांना बळ देण्याचे प्रयत्न केले जात आहे. मात्र, आजही महिलांना उंबर्याच्या आत ठेवून त्यांच्यावर हक्क गाजविण्याचा पुरूषार्थ मानसिकतेत पुर्णत: बदल झालेला नाही असेच या घटनांवरून दिसत आहे.
एकीकडे महिला अत्याचाराच्या घटनांत वाढ होत आहे. नोकरी, शाळा तसेच घरात शिरून तिची छेड काढली जाते. शहरी भागातील हे चित्र भयावह आहे. एका उच्च शिक्षीत विवाहितेने त्रासाला कंटाळून गळफास घेतला. तर, दुसर्या घटनेत एका आयटी इंजिनिअर पतीचा त्रास सहन न झाल्याने उच्च शिक्षीत विवाहितेने गळफास लावून जीवन संपवले.
दोनच दिवसांपुर्वी महिन्याभरापुर्वी विवाह झालेल्या नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. प्रातिनिधीक घटना म्हणून याकडे पाहता येईल. मात्र, सातत्याने सांस्कृतिक व शिक्षणाच्या माहेर घरात या घटना घडत असून, तिचा छळ केला जात आहे.
पोलीस दप्तरी नोंदी झालेल्या या घटना आहेत. पोलिसांपर्यंत न पोहचलेल्यांची संख्याही मोठी आहे. हुंड्यापासून कौटुंबिक हिंसाचार ते अंधश्रद्धेच्या आहारी गेलेली कुटूंब विवाहितांचा छळ करत आहेत. प्रथम या विवाहित त्रास सहन करतात. मात्र अतिरेक झाल्यानंतर त्याची वाच्यता होते. आई-वडिल तसेच नातेवाईकांना या गोष्टी सांगितल्या जातात. त्यातून दोन्ही कुटूंबातील वडिलधारी मंडळी एकत्रित येऊन मार्ग काढतात. मात्र, काही दिवस सुखाने गेल्यानंतर पुन्हा छळ सुरू होतो. मग, अशावेळी या विवाहिता सततच्या त्रासाला कंटाळूनजीवन संपवितात, असे काही प्रकरणातून निदर्शनास आले आहे.
पुण्यासारख्या सुसंस्कृत, सांस्कृतिक अन शिक्षणाच्या माहेर घरात गेल्या ९ वर्षात जाचाला कंटाळून २०७ विवाहितांनी जीवन संपविले आहे. अगदी शुल्लक कारणावरून विवाहातांचा छळकरून त्यांना मानसिक व शारिरीक छळ केला जातो.
बीएनएस अंतर्गत कलम १०८ व ८० कायद्यानुसार कडक शिक्षा
भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत कलम ८० नुसार, एखाद्या विवाहित महिलेचा मृत्यू विवाहाच्या ७ वर्षांच्या आत जळणे, शारीरिक जखम किंवा संशयास्पद परिस्थितीत झाला असल्यास, व तिच्या मृत्यूपूर्वी तिचा नवरा किंवा त्याचे नातेवाईक हुंड्याच्या मागणीसाठी तिचा छळ किंवा अत्याचार करत असल्याचे सिद्ध झाले, तर ही घटना ‘हुंडाबळी’ म्हणून गणली जाते.
कलमानुसार अशा प्रकरणांत कठोर शिक्षा ठोठावली जाऊ शकते. आरोपी पती किंवा त्याचे नातेवाईक दोषी आढळल्यास त्यांना आजीवन कारावास किंवा किमान ७ वर्षांची शिक्षा होऊ शकते. बीएनएसअंतर्गत कलम १०८ मध्ये एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीस आत्महत्या करण्यास उद्युक्त करते किंवा त्यास मदत करते, तर त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होतो. याअंतर्गत दोषी आढळलेल्या व्यक्तीस १० वर्षांपर्यंतची तुरुंगवास व दंडही होऊ शकतो. या कलमाचा उद्देश मानसिक त्रास, छळ किंवा दबावामुळे आत्महत्या करण्यास भाग पडणाऱ्या घटनांना आळा घालणे हा आहे.
वर्षाला अडीचशे ते तीनशे गुन्हे
पुण्याचा विस्तार वाढला आहे. परराज्यातून व गावातून आलेले कुटूंब उपनगरात वसले आहेत. विवाहितांचा छळाचे जवळपास एका वर्षाच अडीचशे ते तीनशे गुन्हे नोंद होत असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. पोलिसांनी दाखल केलेले किंवा तडजोडीनंतर दाखल झालेले हे गुन्हे आहेत. परंतु, दारूपिऊन मारहाण, त्रास अशा अनेक घटना सातत्याने घडत असल्याचे दिसते.
असाही गैरफायदा…
काही विवाहितांकडून स्वर्थासाठीही महिला कायद्याचा आधार घेऊन पतीसह त्याच्या कुटूंबियाला धमकाविण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे काही घटनांमधून समोर आले आहे. पुण्यात गेल्या वर्षात पत्नी व तिच्या कुटूंबियांच्या त्रासाला कंटाळून पतींनी आत्महत्या केल्याचे दोन प्रकार घडलेले आहेत.
ही आहेत, विवाहितांच्या छळाची कारण…
तुला स्वयंपाक येत नाही. लग्नात तुझ्या वडिलांनी आमचा मानपान केला नाही. घर, दुकान तसेच गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आण. तुझ्या येण्याने माझ्या आयुष्यात अडचणी येत आहेत. तुझ्या मुळे मला येश येत नाही. तर, घरात सतत कोणी तरी आजारी पडत आहे. मुल बाळ होत नाही, चारित्र्यावर संशय तसेच तुझ्या कुटूंबियांनी जादोटोणा केला आहे. यासह अशा अनेक कारणांवरून विवाहितांचा छळ होत असल्याचे पोलिसांकडे आलेल्या तक्रारींमधून समोर आले आहे.
नऊ वर्षांत विवाहितांच्या आत्महत्या
२०१७—५४
२०१८—३६
२०१९—१६
२०२०—१९
२०२१—२२
२०२२—१६
२०२३— २०
२०२४— १५
२०२५ (एप्रिल)— ०७
एकूण– २०७