अक्कलकोट येथील 28 वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
अक्कलकोट : सध्या वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. कधी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याचे पाहिला मिळत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशातच तालुक्यातील नागूर येथे शेत असलेल्या 28 वर्षीय सुनील चौडप्पा कुंभार या तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सुनील कुंभार हा अविवाहित तरुण होता. बँकेच्या कर्जवसुलीच्या तगाद्याला व साखर कारखान्याने वेळेवर बिल दिले नसल्याने कंटाळून विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा आरोप कुंभार यांच्या नातेवाइकांनी केला आहे. सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेबाबत ग्रामस्थ व नातवाईकांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पोलिसांना माहिती दिल्याचे सांगितले.
सुनील हा आपली आई, वडील व बहीण यांच्यासोबत राहतो व शेती करतो. त्याने शेतीच्या व्यवसायासाठी महाराष्ट्र बँकेकडून कर्ज घेतले होते. परंतु, गेल्या वर्षापासून धोत्रीच्या गोकूळ साखर कारखान्याने उसाचे बिल वेळेवर दिले नसल्याने बँकेचे कर्ज भरू शकला नाही. बँकेने गेल्या सहा महिन्यांपासून कर्ज वसुलीसाठी तगादा लावल्याने नैराश्येपोटी त्याने आत्महत्या केली. रासायनिक औषध प्राशन केले होते. मात्र, त्यांस उपचारासाठी सोलापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे.
आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली
औषध प्राशन करण्यापूर्वी त्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिलेली चिठ्ठी त्याच्या खिशात सापडली आहे. मृत शेतकरी कुंभार यांच्यावरील कर्जमाफ करण्यात यावे म्हणून मैंदर्गी येथील महाराष्ट्र बँकेसमोर ग्रामस्थ व नातेवाईक आंदोलन करणार आहेत.
…तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही
या घटनेबाबत ग्रामस्थांनी सोमवारी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालय व अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांना कळविले आहे. त्यांचे प्रतिनिधीही शासकीय रुग्णालयाकडे दिवसभर फिरकलेसुध्दा नाही. जोपर्यंत शासनाच्या वतीने आर्थिक मदत मिळत नाही व बँकेच्या शाखाधिकाऱ्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. यासाठी तहसीलदार व लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेऊन निर्णय घेण्याची मागणी आहे.