
Koyna Dam
पाटण / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कोयना, नवजा, तापोळा, महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस पडत असून, ‘शिवाजीसागर’ जलाशयात प्रतिसेकंद तब्बल ७८,४८७ क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. आगामी काळातील पाऊस, धरणाची एकूण साठवण क्षमता लक्षात घेता खबरदारी म्हणून गुरुवारी (दि. २५) संध्याकाळी ५ वाजता धरणाचे ६ वक्र दरवाजे प्रथम दीड तर संध्याकाळी ७ वाजता ४ फुटांनी उचलण्यात आले.
धरणाचे दरवाजे उचलण्यात आल्याने त्यातून २० हजार व पायथा वीजगृहातील २० मेगावॅट क्षमतेच्या एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद १,०५० असे एकूण २१,०५० क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी (दि. २६) सकाळी ७ वाजता हा विसर्ग वाढवून ३० हजार क्युसेक करण्यात आला. सध्या धरणाचे ६ वक्र दरवाजे ६ फूट उचलून नदीपात्रात ३२ हजार १०० क्युसेक विसर्ग सुरू आहे.
पूर्वेकडील पाऊस व धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाल्याने नदीकाठची गावे व लोकवस्त्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा जोर आणि धरणात पाण्याची आवक वाढली तर त्याच पटीत धरणातून जादा पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
धरण भरण्यासाठी २४.०६ टीएमसी पाण्याची आवश्यकता
धरणाच्या एकूण १०५.२५ टीएमसी पाणीसाठ्यापैकी आता ८१.१९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी यापुढे २४.०६ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. धरणात सध्या ७६.०७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असून, मागील 24 तासात धरण पाणीसाठ्यात ५.९३ टीएमसीने वाढ झाली.