भीमा नदीपात्रात 40 हजार क्युसेकने विसर्ग; बंधाऱ्यासह लहान-मोठ्या पुलावरील वाहतूक बंद
सोलापूर : उजनी धरणातून भीमा नदीपात्रात ४० हजार २१ क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. याबरोबरच भीमा नदी पात्रातील सर्व प्रकारचे बंधारे किंवा पूलावरुन नागरिकांनी कोणत्याही प्रकारची वाहतूक करु नये, असे देखील आवाहन करण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून निरा खोरे व भीमा खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नीरा नदीपात्रात वीर धरणामधून ६ हजार ५३७ क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे. भीमा नदीपात्रामध्ये उजनी धरणामधून ३१ हजार ६०० क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे. तसेच नीरा व भीमा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे अनियंत्रित विसर्ग नदीपात्रामध्ये येत आहे. त्यामुळे सद्यस्थितीतील विसर्ग पाहता भीमा नदीपात्रामध्ये सोमवारी पाच वाजता ४० हजार २१ क्युसेकपेक्षा जास्त विसर्ग प्रवाहित होत आहे.
भीमा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तरी, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भीमा नदीवरील बंधाऱ्यांवरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. भीमा नदीच्या काठावरील सर्व गावांमधील नागरिकांनी सतर्कता बाळगावी तसेच बंधारे किंवा पूल पाण्याखाली असताना कोणत्याही प्रकारची वाहतूक करु नये, असे देखील आवाहन करण्यात आलेले आहे.
चंद्रभागा नदीपात्रातील मंदिरांना पाण्याचा वेढा
उजनी धरणातून सध्या भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे धरणातून सोडलेले पाणी सध्या पंढरपूरात पोहचलेले आहे. त्यामुळे येथील चंद्रभागा नदीचे पात्र सध्या दुथडी भरुन वाहताना दिसत आहे. चंद्रभागा नदी पात्रातील होडीचालकांना क्षमतेपेक्षा जादा भाविकांना बसविण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे प्रत्येक होडीत केवळ २० भाविकांना बसविण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.