प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नाशिकमध्ये सापडलं घबाड; तब्बल ५ कोटींची रोकड जप्त, नेत्यालाही घेतलं ताब्यात
विधानसभा निवडणुकीच्या प्रचार आणि मतदानालाही काही तास शिल्लक आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गैरप्रकार टाळण्यासाठी शेवटच्या टप्प्यात पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची राज्यभर करडी नजर आहे. गस्तही वाढवण्यात आली आहे. दरम्यान नाशिकमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. एका नामांकित हॉटेलमध्ये आयोगाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला असून यामध्ये तब्बल पाच कोटींची रोकड जप्त केली आहे. एका नेत्यालाही वाहनासोबत ताब्यात घेतलं आहे.
निवडणुकीसंदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी आज नाशिकमधील एका नामांकित हॉटेलमध्ये छापा मारला. या छाप्यात अधिकाऱ्यांनी एका राजकीय नेत्याकडे ५ कोटीची रोकड आढळून आली. अधिकाऱ्यांनी लागलीच त्या नेत्याला त्याच्या वाहनासह ताब्यात घेतलं. दरम्यान त्याच्याकडे इतकी मोठी रक्कम कुठून आली कुठे घेऊन चालला होता. याची कसून चौकशी करण्यात येत आहे.
पोलिसांकडून या घटनेचा तपास अद्याप सुरु आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेला नेता कोणत्या राजकीय पक्षाशी निगडित आहे, याची चौकशी करण्यात येत आहे.
क्राईमच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
औरंगाबादमध्येही पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. निवडणुकीत वाटप करण्यासाठी आणलेली अवैध आणि बनावट दारूचा साठा छत्रपती संभाजीनगरच्या राज्य उत्पादन शुद्ध विभागाने धाड टाकून जप्त केला आहे. सुदंरवाडी परिसरात अधिकाऱ्यांनी ही धाड टाकली. ढाबा मालक आणि अवैद्यरित्या सुरू असलेली मद्यविक्री आणि मद्यप्राशन करणाऱ्या सर्वांवर दारु बंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून राज्यात पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची रोकड, बेकायदेशीर दारूसाठा आणि मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात असून २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहेत. याकाळात मोठा गैरप्रकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन, निवडणूक अधिकारी आणि उत्पादन शुल्क विभागाचे अधिकाऱ्यांची करडी नजर असणार आहे. शिवाय गस्तही वाढवण्यात आली आहे.