अड्याळ येथे विजेच्या धक्क्याने बालकाचा मृत्यू
पवनी : आई-वडिलांच्या गैरहजेरीत घरातील टीव्ही सुरू करण्याच्या प्रयत्नात विजेचा धक्का लागून 10 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. 29) अड्याळमध्ये घडली. सानिध्य विलास मेघराज असे मृताचे नाव आहे. येथील मंडईपेठ येथे कुटुंबासह राहणारा सानिध्य गावातीलच जिल्हा परिषद उत्तर बुनियादी शाळेतील चौथीचा विद्यार्थी होता.
हेदेखील वाचा : ‘जशी करणी तशी भरणी सुरु’; लक्ष्मण हाकेंच्या कथित मद्यप्राशन व्हिडिओवर मनोज जरांगे पाटील यांची टिप्पणी
रविवारी सुट्टी असल्याने आई-वडील सकाळीच घरची कामे आटोपून शेतातील कामे करण्याकरिता घराच्या बाहेर पडले होते. यावेळी त्यांची दोन्ही मुले घराच्या अंगणात खेळत होती. मोठा भाऊ सोहम हासुद्धा घराबाहेर खेळण्यासाठी गेला होता. काही वेळाने सोहम घरात आला असता, लहान भाऊ सानिध्य हा निपचित पडलेला दिसला. त्याने अनेकदा आवाज देऊनही तो उठला नाही. हात लावला असता त्याच्या शरीरात हलकासा करंट असल्याचे जाणवले.
इलेट्रॉनिक्स बोर्डवरून सुरू असलेला विद्युत प्रवाह दिसताच त्याने घराबाहेर येऊन शेजाऱ्यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ संपर्क साधून वडिलांना बोलावले. यानंतर उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी अड्याळ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. अंत्यसंस्कार पिंपळगाव या मूळ गावातील स्मशानभूमीत करण्यात आले.
हेदेखील वाचा : तीन तोळ्यांची सोनसाखळी लंपास; सासरच्यांचा थेट जावयावर संशय, पोलिसांतही तक्रार