बाप रे! 1 लाईट आणि 1 पंखा अन् वीज बिल आले तब्बल ८३००० रूपये (फोटो सौजन्य-X)
वीज बिले वाढीव पाठवली जातात अशी तक्रार वारंवार ग्राहकांकडून केली जाते. पण वीज बिल जर, हजारो रुपयांचे आले तर. संबंधित ग्राहकाला हादराच बसेल ना? तसंच काहीसं शिरपूर तालुक्यात पाहायला मिळालं आहे. शिरपूर तालुक्यात वीज महामंडळाने एका झोपडीत वास्तव्य करणाऱ्या 70 वर्षीय महिलेला तब्बल ८३००० रूपयांचे वीज बिल आलं आहे. या घरात केवळ 1 लाईट आणि 1 पंख्याचं वापर होत असताना महिलेला तब्बल 82 हजार 100 रुपयांचे वीज बिल दिले.
गेल्या महिन्याभरापासून महामंडळाकडे लेखी तक्रार केल्यानंतर सुधारणा करण्याऐवजी जुलै महिन्याचे 1 हजार 160 रुपये बिल जोडून 83 हजार 260 रुपयांचे वीज बिल पाठविण्याचा नवा विक्रम करण्यात आला. त्याविरोधातही लेखी तक्रार देण्यात आली आहे. या प्रकारामुळे कुटुंबाला जोरदार शॉक बसला आहे. वीज मंडळाच्या गलथान काराभावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले. तालुक्यातील लौकी शिवारात जितेंद्र हिरालाल भील एका झोपडीत कुटुंबासमवेत वास्तव्यास आहेत. त्यांच्यासमवेत 70 वर्षीय आई, पत्नी आणि दोन मुले राहतात.
लाईट मिळावी यासाठी त्यांनी आई इंदूबाई हिरालाल भील यांच्या नावे वीज मीटर घेतलेले आहे. जितेंद्र भील 200 रुपये रोजंदारीने कामाला जातात. त्यांच्या झोपडीत 1 लाईट आणि 1 टेबल पंखा असून याव्यतिरीक्त काहीही नाही. जून महिन्यात त्यांना तब्बल 82 हजार 100 रुपये वीज बिल देण्यात आले. त्याबाबत जितेंद्र भील यांनी महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधला. घरात एक लाईट आणि एक पंख्याशिवाय काहीही नसल्याचे सांगितले. महामंडळाच्या कर्मचाऱ्याने त्यांच्याकडून वीज बिल हिसकावून घेतले. एक अर्ज करा आणि चालते व्हा म्हणत हाकलून लावले.
जितेंद्र भील तसेच माघारी घरी आले. दोन दिवसांपूर्वी त्यांना जुलै महिन्याचे बिल प्राप्त झाले. त्यावर महिन्याभराचे 1 हजार 160 व मागील महिन्याची 82 हजार 100 रुपये थकबाकी असे एकूण 83 हजार 260 रुपयांचे बिल देण्यात आले. काल दि. 31 रोजी त्यांनी पुन्हा महामंडळाचे कार्यालय गाठले. महिन्याभरापूर्वी अर्ज केला होता, त्याबाबत विचारणा केली. कर्मचाऱ्यांनी मागील अर्जाची शोधाशोधही केली. परंतु अर्ज मिळून आला नाही. कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. भील यांनी पुन्हा तक्रारी अर्ज दिला आहे. त्यांना वीज महामंडळ न्याय देईल की नाही ते लवकरच कळेल. गोरगरीबांची फसवणूक करुन पैसे उकळण्याचा नवा धंदा महामंडळाच्या काही महाभागांनी सुरु केला आहे का? असाही प्रश्न आता विचारला जात आहे.
एक लाईट आणि एक पंखा महिनाभर 24 तास वापरला तरीही 82 हजार बिल येणार नाही. परंतु तालुक्यात हा चमत्कार घडला आहे. महामंडळाच्या गलथान आणि गचाळ कारभाराविरोधात असंख्य तक्रारी आहेत.