फोटो सौजन्य - Social Media
ठाणे जिल्ह्यातील बदलापूरसह आसपासच्या ग्रामीण भागात बलिप्रतिपदेच्या दिवशी गुरांना आगीवरून उडवण्याची पारंपरिक प्रथा आजही उत्साहात चालू आहे. सकाळी लवकर शेतकरी गुरांना स्वच्छ आंघोळ करून सजवतात. त्यांचे शिंग रंगवले जातात, तेल लावले जाते, फुगे बांधले जातात. अंगावर गेरू व पांढऱ्या रंगाचे ठसे उमटवले जातात. गळ्यात घुंगरू व हार घालून गुलाल उधळला जातो. या पारंपरिक विधीत शेतकरी प्रार्थना करतात “ईडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो”.
हा उत्सव केवळ धार्मिक नाही तर शेतकऱ्यांच्या कृतज्ञतेचे प्रतीक देखील आहे. पावसाळ्यानंतर भातशेती संपल्यावर गुरांना काम नसल्यामुळे ते सुस्तावलेले असतात. बलीप्रतीपदेच्या दिवशी गुरांना आगीवरून उडवल्याने त्यांच्या पायांवरील रोग, अंगावर चिकटलेला पिसवा, गोचिड व इतर जीवजंतू नष्ट होतात, असे स्थानिक शेतकरी मानतात. तसेच असेही मानले जाते की, गुरांना भविष्यात कुठे वणवा पेटल्यास ते सैरभैर होणार नाहीत.
मात्र, मागील काही वर्षांत प्राणी मित्रांनी या प्रथेवर टीका केली आहे. त्यांचा असा दावा आहे की गुरांना आगीपासून इजा होऊ शकते. त्यावर स्थानिक शेतकरी सांगतात की, ही आगी सौम्य असते आणि गुरांसाठी धोका निर्माण करत नाही.
यावर्षी बुधवारी (दि. 22) नवीन वडवली गावात हा उत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदात साजरा झाला. गावकरी गुरांच्या पूजनासह त्यांना आगीवरून उडवताना उपस्थित होते. उत्सवात गुरांना सजवण्याची प्रक्रिया, आगीवरून उडवणे, प्रार्थना व गुढीपाडव्याप्रमाणे उत्साह दिसून आला. शेतकरी आणि स्थानिक लोकांसाठी हा दिवस केवळ धार्मिक विधी नव्हे तर सांस्कृतिक वारसा आणि गुरांप्रती कृतज्ञतेचा दिवस मानला जातो. अशा पारंपरिक उत्सवांमुळे स्थानिक समाजात एकत्रित आनंद, भक्तिभाव आणि संस्कृती जपण्याची भावना कायम राहते.