खेड : कधी तलावात तर कधी नदीमध्ये अचानकपणे माशांचा मृत्यू होतो. दिवसेंदिवस हे प्रमाण अधिकच वाढत जाताना दिसत आहे याचं कारण म्हणजे औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांचा निष्काळजीपणा. अशीच एक निष्काळजीपणाची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील जलशुद्धीकरण केंद्राची शुद्ध पाणी वाहून नेणारी जलवाहिनी कोतवली गावाजवळ फुटल्याने वाशिष्ठी नदीपात्रातील मासे मृत अवस्थेत आढळल्याची घटना दीपावलीच्या सणाच्या काळात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील मच्छिमारांमध्ये तसेच ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यांतून येणारे दूषित पाणी जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केल्यानंतर नदीत सोडले जाते. मात्र, दीपावलीच्या सुट्टीचा गैरफायदा घेत काही कारखान्यांकडून अप्रक्रियायुक्त दुषित पाणी थेट नदीपात्रात सोडले जाते, असा आरोप स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. या पाण्यामुळे कोतवली गावाजवळ मोठ्या प्रमाणात मासे मृत पावले असून पर्यावरणीय संकटाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी तत्काळ संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून “दूषित पाणी वाहून नेणारी जलवाहिनी तात्काळ दुरुस्त करावी आणि मच्छिमारांच्या नुकसानीचा पंचनामा करावा” अशी मागणी केली. तसेच पंचनामा होईपर्यंत जलवाहिनीची दुरुस्ती होऊ देणार नाही, असा इशाराही दिला.
या घटनेनंतर एमआयडीसीचे ठेकेदार, डेप्युटी इंजिनिअर आर. जी. कुळकर्णी यांच्या उपस्थितीत 27 ऑक्टोबर 2025 रोजी कोतवली ग्रामपंचायत कार्यालयात एक संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जलशुद्धीकरण केंद्राचे अधिकारी सहभागी होणार आहेत.या घटनेला जबाबदार कोण आणि वाशिष्ठी नदीत पुन्हा दुषित पाणी कसे पोहोचले, याची बैठकीत सखोल चौकशी केली जाणार असून पंचनामा केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या प्रकारामुळे औद्योगिक क्षेत्रातील जलशुद्धीकरण प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आता या प्रकरणात काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.