औरंगजेबावरील विधानावरून अखेर अबू आझमींची माघार; उत्तर प्रदेशच्या विधानसभेत उमटले होते पडसाद
विधीमंडळ अधिवेशनातून निलंबन आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभेत औरंगजेबावरील विधानाचे पडसाद उमटल्यानंतर अबू आझमी यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. औरंगजेब क्रूर नव्हता, त्याच्या काळात देशाचा जीडीपी २४ टक्के होता आणि शिवाजी महाराजांसोबत त्याची लढाई धार्मिक नव्हती, असं मत त्यांनी माध्यमांसमोर व्यक्त केलं होतं. छावा चित्रपटातील औरंगजेबाच्या भूमिकेच्या चर्चेदरम्यान त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचे पडसाद राज्यभर उमटले होते.
“मी मांडलेलं माझं मत मागे घेत आहे कारण यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. लोक मला फोन करत आहेत आणि शिवीगाळ करत आहेत. मी फोन उचलत नाही; ते मला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. आता, सभापतींनी मला निलंबित केलं आहे. मला फक्त विधानसभा चालावी अशी इच्छा आहे आणि म्हणूनच मी माझं विधान मागे घेत आहे. आमच्याकडे खूप समस्या आहेत, आमच्या भागातील लोकांना पाणी मिळत नाही, रस्ते खराब आहेत, गटारं खराब आहेत आणि शाळां आणि रुग्णालयांमध्ये समस्या आहेत. आम्ही त्यावर चर्चा का करत नाही? यावर सर्वांचा वेळ का वाया घालवायचा? हेच कारण आहे की मी माझे शब्द मागे घेतले, असं स्पष्टीकर त्यांनी दिलं आहे.
#WATCH | Mumbai: On being asked about taking back his statement on Aurangzeb, Maharashtra SP MLA Abu Azmi says, “I am taking back what I had said as there has been a huge turmoil because of this. People are calling me and abusing me; I am not picking up the phone; they are… pic.twitter.com/SkGPTsNSt0
— ANI (@ANI) March 5, 2025
“चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिर बनवलेली आहेत. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जी लढाई होती, ती लढाई राज्य कारभाराची होती. ती लढाई कुठेही हिंदू आणि मुस्लिम अशी नव्हती”,
“मी असं मानतो की औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तानपर्यंत होती. त्या काळात आपला जीडीपी २४ टक्के एवढा होता. तेव्हा भारताला सोने की चिड़िया म्हटलं जायचं. मग मी याला चुकीचं म्हणू का? तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबाची लढाई ही धर्माची होती असं मी मानत नाही”, असं अबू आझमी यांनी म्हटलं होतं.