
Naturopathy is the way to achieve balance between nature and man! Governor Acharya Devvrat asserts
राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेने (एनआयएन) आयोजित केलेल्या तीन दिवसीय नैसर्गिक खाद्य महोत्सवाचा समारोप येवलेवाडी येथील निसर्ग ग्राम येथे झाला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय आयुषमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते. प्रसंगी केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या सहसचिव डॉ. कविता जैन, पुणे विभागाच्या पोस्टमास्तर जनरल सुचिता जोशी, एनआयएनचे प्रभारी संचालक अमरेंद्र सिंह आणि आंतरराष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेचे अध्यक्ष अनंत बिरादार उपस्थित होते.
या वेळी संस्थेच्या वतीने प्रकाशित पुस्तकाचे तसेच एनआयएनवरील विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. गांधी जयंतीनिमित्त आयोजित विविध स्पर्धांमधील विजेते जाहीर करण्यात आले. दादाजी डॉ. दिनशा के. मेहता पुरस्कार व डॉ. एस. एन. मूर्ती पुरस्कार प्रदान करण्यात आले.
राज्यपाल देवव्रत म्हणाले, ‘संतुलित आहार, योग्य व्यायाम, सकारात्मक चिंतन आणि निसर्गाशी एकरूप होणारी जीवनशैली अंगीकारली तर रोगांविरुद्ध लढण्याची शक्ती शरीरातच निर्माण होते. वाढत्या जीवनशैलीजन्य आजारांना रोखण्यासाठी निसर्गोपचार हा सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लठ्ठपणा कमी करण्याच्या अभियानातही निसर्गोपचार महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले की, ‘आरोग्य विकत घेता येत नाही, ते कमवावे लागते. निसर्गाशी प्रामाणिक राहिल्यास पृथ्वी आणि मानवाचे आरोग्य टिकून राहते. योग, निसर्गोपचार आणि रसायनमुक्त आहार हे आजच्या तणावपूर्ण जीवनात अधिक आवश्यक झाले आहेत.’
हेही वाचा : 19 वर्षांखालील विश्वचषक 2026 चे वेळापत्रक जाहीर! भारत असणार ‘अ’ गटात; 6 फेब्रुवारीला रंगणार अंतिम सामना
कार्यक्रमाचे स्वागत-अभिभाषण अमरेंद्र सिंह यांनी केले. प्रास्ताविक सुचिता जोशी आणि डॉ. कविता जैन यांनी मांडले. आभार प्राध्यापक डॉ. डी. सत्यनाथ यांनी मानले. ‘निसर्गोपचाराच्या माध्यमातून नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करणे’ या संकल्पनेवर आधारित महोत्सवाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती प्रकाशन अधिकारी सौरभ साकल्ले यांनी दिली.