मराठा समाजानंतर आता 'हा' समाज आरक्षणासाठी आक्रमक; हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षणाची केली गेली मागणी
जालना : मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यानंतर राज्यात बंजारा समाज देखील आक्रमक झाला असून, या गॅझेटनुसार समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, आता आदिवासी समाज या विरोधात उभा झाला असून, बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण न देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
राज्यातून बंजारा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. तर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये; या मागणीसाठी आज जालन्यात आदिवासी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. जालना शहरातील अंबड चौफुली परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली असून, हा मोर्चा जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी राज्यांमध्ये विविध ठिकाणी बंजारा समाजाचे आंदोलन सुरू आहे.
दरम्यान, बंजारा समाजाच्या मागणीला विरोध करत जालन्यात देखील आदिवासी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. ज्या आमदारांनी बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी पाठिंबा दिला आहे, त्यांचा देखील निषेध यावेळी आदिवासी बांधवांनी नोंदविला. यामुळे आरक्षणाच्या या मुद्द्यावरून बंजारा समाजाच्या मागणी विरोधात आंदोलन पुकारण्यात आल्याचे पाहण्यास मिळाले आहे.
धनंजय मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गातील समावेशाच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी पाठिंबा दिला. याबाबतचे पत्र मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले असून, हैदराबादनुसार आरक्षणाची मागणी केल आली आहे.
मराठा आरक्षणाला कोर्टात आव्हान?
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले होते. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटलांनी आंदोलन उभे केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने आरक्षणाचा जीआर काढला आहे. मात्र, या आरक्षणाला कोर्टात आव्हान दिले जाऊ शकते.