बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) याची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. मात्र आज पहाटे सलमान खानच्या वांद्रेमधील घरावर गोळीबार झाल्याने सगळीकडे मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळात देखील उमटले आहेत. सलमान खानच्या वांद्रे निवास्थानी पहाटे ५ वाजताच्या सुमारास गोळीबार करण्यात आला.गोळीबार झाल्यानंतर आरोपी घटनस्थळावरून फरार झाले. पोलिसांकडून गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. या घटनेवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे सर्व अत्यंत दुर्दैवी आहे. कारण सलमान खान ज्या परिसरामध्ये राहतो तो भाग खूप प्रसिद्ध आहे. तिथे अनेक लोक सकाळी मॉर्निंग वॉकला जातात. तसेच भाजीवाले, दूधवाले तिथे येतात. त्या सर्वांच्या सुरक्षेचे काय? हे गृह खात्याचे अपयश आहे. सलमानच्या कुटुंबावर दबाव आहे. आता आपण पुण्यात आहोत आणि इथे काय चाललं आहे हे आपण पाहत आहोत. हे खूप सुशिक्षित ठिकाण आहे तिथे लोक शांततेने राहतात. पण इथे मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली आहे. मी आरोप करत नसून ही भारत सरकारने महाराष्ट्रासाठी दिलेली आकडेवारी आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सलमान खानच्या घरी पहाटेच्या ५ वाजता गोळीबार झाल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे सलमान खानच्या घराभोवती असलेल्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. तसेच गोळीबार झाल्यानंतर फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी हजर झाली. पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपींना ओळखण्यासाठी आम्ही परिसर आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले.
आज पहाटे ५ वाजताच्या सुमारास सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला. गोळीबार करून २ आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. त्यांनी ३ राऊंड फायरिंग गोळ्या चालवल्या, असे पोलिसांनी सांगितले आहे.गोळीबार झाल्यानंतर क्राइम ब्रँचची टीमही घटनास्थळी हजर झाली. गोळीबार झाकलेल्या ठिकाणी गोळ्यांच्या खुणा तपासण्यात आल्या आहेत. सलमानची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात. गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर चाहते मोठे गर्दी करतात.






