बदलापूर : काल (मंगळवारी) देशभरात मोठ्या उत्साहात व दिमाखात १५ ऑगस्ट साजरा करण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमधील कु.ब.न.प.पर्यावरणपूरक शाळा क्र १५, एरंजाड या शाळेत देशाबद्दल प्रेम, आत्मियता, शहिदांच्या आठवणी, वीरांना वंदन, विद्यार्थांचे कर्तव्य तसेच सामाजिक बांधलिकीची जाण करुन देणारा १५ ऑगस्ट साजरा करण्यात आला. दरम्यान, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रम सांगता सोहळ्याला ९ ऑगस्टपासून सुरुवात झाली होती. त्याची काल सांगता करण्यात आली. “मेरी माटी मेरा देश” अर्थात ‘माझी माती माझा देश’ या उपक्रमांतर्गत शाळेत विविध कार्यक्रम घेण्यात आले. मागील तीन दिवसांपासून विद्यार्थांनी एरंजाड गावातून प्रभात फेरी काढत, देशभक्तीच्या आणि स्वच्छतेच्या घोषणा दिल्या. तसेच शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले.
दरम्यान, काल १५ ऑगस्ट साजरा करताना, ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह विद्यार्थ्यांनी देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थांनी सुरेख व सामाजिक संदेश देत भाषणाच्या माध्यमातून आपले विचार मांडले. इयत्ता पहिलीतील चिमुकल्यांच्या भाषणांनी स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाची रंगत वाढवली. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला. दरम्यान, यावेळी शिष्यवृत्तीत उल्लेखनीय यश संपादन केल्यामुळं अक्षय नारायण जाधव या विद्यार्थ्याचा विशेष सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्यदिनी कार्यक्रमाला एरंजाड गावातील मान्यवर, पालक, नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका शिक्षक, विद्यार्थी यांनी खूप मेहनत घेतली. तसेच एरंजाड गावातील नागरिकांचे मोठे सहकार्य लाभले.