मुंबई: काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते झाल्यानंतर विजय वडेट्टीवार यांचा अधिक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून ते महायुतीतील नेत्यांवर थेट आरोप करत असून, कोणतीही भीडभाड न ठेवता टीकाही करताना दिसत आहेत. पुण्यातील मंगेशकर रुग्णालयातील घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लता मंगेशकर यांच्या कुटुंबावरच आरोपांची मालिका सुरू केली. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कडाडून प्रत्युत्तर दिले आहे.
“तुमची स्पर्धा नाना पटोलेंशी असेल, पण टीका करताना समोरच्या व्यक्तीचे समाजातले स्थान, प्रतिमा आणि योगदान याचाही विचार करायला हवा. स्वतःचे नेतृत्व सिद्ध करण्यासाठी वडेट्टीवार कोणत्याही विषयावर तपासणी न करता थेट आरोप करत आहेत, लक्ष वेधून घेण्याचा त्यांचा हा खटाटोप आहे,” अशा शब्दांत बावनकुळेंनी वडेट्टीवारांना सुनावलं आहे.
Prashant Koratkar: अखेर प्रशांत कोरटकर तुरूंगाबाहेर; कोल्हापूर पोलिस सीमेपर्यंत देणार सुरक्षा
“या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. नियमाप्रमाणे कारवाई होईल. काही त्रुटी असतील, तर त्या सुधारल्या जातील. विजय वडेट्टीवार यांनी मुद्दे मांडणं ठीक आहे, पण त्यांनी दुरुस्तीतही पुढाकार घ्यायला हवा. विजय वडेट्टीवार यांनी स्फोटक विधाने करण्याआधी संबंधित विषयांची पूर्ण माहिती घ्यावी, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
“कोणावर आरोप करताना त्या व्यक्तीचे समाजातील स्थान आणि प्रतिमा काय आहे, याचा विचार करणे आवश्यक आहे. निव्वळ चर्चेत राहण्यासाठी किंवा राजकीय स्पर्धेसाठी बिनधास्त आरोप करणं योग्य नाही,” असा सल्ला त्यांनी वडेट्टीवारांना दिला. तसंच, “आम्हाला केवळ आरोपासाठी आरोप करायचे नाहीत. काँग्रेसच्या कार्यकाळात काय घडलं, कोण काय करत होते, हे आम्हाला माहिती आहे. ती प्रकरणे उघड केली तर तुम्हीच आम्हावर राजकारण करत असल्याचा आरोप कराल,” असे म्हणत बावनकुळेंनी वडेट्टीवारांना संयम राखण्याचे आवाहन केले.
Pratap Sarnaik on ST : ‘आम्ही आमचा हक्क मागतोय, भीक नाही…’ प्रताप सरनाईक अजित पवारांवर का चिडले?
राज्यात विविध ठिकाणी वाळू माफियांशी संगनमत करून कार्य करणाऱ्या 10 ते 15 अधिकाऱ्यांची यादी सरकारकडे आली आहे. या प्रकरणात कारवाईची तयारी सुरु असून, राज्य सरकारने वाळूघाटांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून यंत्रणा सक्रिय केल्या आहेत, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. विशेषतः पर्यावरण विभागाची परवानगी नसतानाही भंडारा जिल्ह्यात काही वाळूघाट सुरू असल्याचे उघड झाले आहे. याबाबत विभागीय आयुक्तांनी पूर्वीच संबंधितांना सूचना दिल्या होत्या, मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. त्यामुळे सरकारने आता या प्रकरणात सुमोटो पद्धतीने लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. चंद्रपूर, भंडारा, जालना, जाफराबाद, राहुरी तसेच कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यांतून सुद्धा अवैध वाळू उपशयाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. “ज्या ज्या ठिकाणांहून तक्रारी येत आहेत, त्या सर्व ठिकाणी सरकार स्वतःहून कारवाई करत आहे,” असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.
महायुती सरकारच्या अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना (डीपीडीसी) निधीच्या वाटपाबाबत ठोस निर्णय घेण्यात आला आहे. महायुतीतील तिन्ही प्रमुख नेत्यांनी एकत्र बसून निधीचे वितरण कसे करावे, पालकमंत्र्यांचे अधिकार काय असावेत, तसेच तालुकास्तरीय समित्यांची रचना कशी असावी यावर चर्चा करून मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत, असंही बावनकुळेनी यावेळी स्पष्ट केलं.