ज्ञानेश्वरी मुंडेंनी केलं विषप्राशन, प्रकृती चिंताजनक, पोलिसांकडून मोठा खुलासा! (फोटो सौजन्य-X)
Dnyaneshwari Munde News Marathi : परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येला 18 महिने उलटूनही मारेकऱ्यांना अटक न झाल्याने त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
दिवसभरात मुंडे कुटुंबीयांनी न्यायासाठी तीव्र आंदोलन सुरू केले. सकाळी त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, जो पोलिसांच्या हस्तक्षेपाने थांबवण्यात आला. त्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षकांना भेटून “माझ्या सिंदूरला न्याय द्या” अशी मागणी केली. मात्र या भेटीनंतर गाडीत बसल्यावर ज्ञानेश्वरी यांनी विष प्राशन केले, ज्यामुळे त्यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर अतिदक्षता विभागात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पतीच्या हत्या प्रकरणात न्याय मिळावा. या मागणीसाठी आक्रमक होत विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचार अतिदक्षता विभागात केले जात आहे. सध्या ज्ञानेश्वरी मुंडे यांची प्रकृती स्थिर असून, विष किती मात्रामध्ये घेण्यात आले? विष कोणत्या प्रकाराचे आहे? हे स्पष्ट झालेले नाही. पुढील तपासणीसाठी त्याचे सॅम्पल घेण्यात आले आहे.
२२ ऑक्टोबर २०२३ रोजी परळी तहसील कार्यालयासमोर महादेव मुंडे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. गेल्या १८ महिन्यांत, या प्रकरणाची सात वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे, तरीही आरोपी अजूनही फरार आहेत. तपासात कोणतीही प्रगती न झाल्याने मुंडे कुटुंब हताश झाले. जानेवारीच्या सुरुवातीलाच ज्ञानेश्वरी यांनी या प्रकरणाची सीआयडी किंवा एसआयटी चौकशीची मागणी केली होती.
पोलीस अधीक्षकांनी आश्वासन दिले आहे की सीआयडीकडून हे प्रकरण दाखल केले जाईल. दरम्यान, या प्रकरणात राजकीय लागेबांधे असल्याचा आरोपही यापूर्वी झाला आहे. हत्येतील आरोपी हे राजकीय नेते वाल्मिक कराड यांच्या मुलाच्या अवतीभवती फिरत असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला होता, ज्यामुळे या प्रकरणाची गुंतागुंत अधिकच वाढली आहे.
२० ऑक्टोबर २०२३ रोजी संध्याकाळी महादेव मुंडे हे ट्युशनहून मुलांना घरी सोडून पिग्मीचे कलेक्शन करत होते. रात्री ९ वाजता त्यांची मोटारसायकल वनविभाग कार्यालयाजवळ आढळली. त्यावर रक्ताचे डाग, चप्पल आणि महत्त्वाची कागदपत्रे होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच महादेव मुंडे यांचा मृतदेह ५० मीटर अंतरावर आढळला. यामध्ये एक चप्पल महादेव मुंडे यांची होती, तर दुसरी कोणाची होती याबाबत माहिती भेटली नाही. मात्र, हा मृतदेह रात्री पोलिसांना का दिसला नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता.