बीड : भाजप आमदार सुरेश धस यांचे निकटवर्तीय असलेला सतीश उर्फ खोक्या भोसले (Satish Bhosale) याने एका व्यक्तीला बॅटने अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड पोलिस त्याचा शोध घेत असताना, तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मात्र, अशा स्थितीत त्याने एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देत आपल्या वागण्याचे समर्थन केले आहे.
मुलाखतीत सतीश भोसलेने स्पष्ट केले की, “आपण एखाद्या लग्नात पैसे ओवाळून टाकतो, त्याला माज म्हणायचं का? मी फक्त मित्राच्या लग्नात आनंदाने हजार रुपये उधळले, यात गैर काय?”तसेच, तो पुढे म्हणाला, “जर हे चूक असेल, तर मग सोशल मीडियावर बघा, लोक तिथे करोडो रुपये उधळतात. मग त्यांच्यावर कोणी काही बोलत नाही. मी कष्टाने कमावलेला पैसा उधळला, त्यात चुकीचं काय?”
Ravindra Dhangekar : “धंगेकरांच्या पत्नीला अटक होईल अशी भीती…; खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप
दरम्यान, सतीश भोसलेच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपशील समोर येत आहे. त्याच्यावर शिरूर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत आणि पोलिस त्याचा शोध घेत आहेत. मात्र, पोलिसांच्या हातावर तुरी देत तो मीडिया प्लॅटफॉर्मवरून आपली बाजू मांडत आहे. आता, पोलिस त्याला लवकरच ताब्यात घेतात की तो आणखी काही खुलासे करत राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने पैसे उधळण्यापासून ते मारहाणीपर्यंत सर्व मुद्द्यांवर आपली बाजू मांडली.
सतीश भोसलेने सांगितले, “कोणी बायांवर पैसे उधळतं, हे बघा ना! मी माझ्या मित्राच्या आनंदासाठी पैसे उधळले, त्याला माज का म्हणायचं? मी एका छोट्या कुटुंबातून येतो. कारखान्यातून पैसे मिळाले, तेव्हा वाटलं की आपणही एक व्हिडीओ बनवावा. हातात पैसे असताना तो क्षण कॅमेरात कैद करायचा होता, म्हणून मी तो व्हिडीओ तयार केला.”
मारहाण प्रकरणाबाबत स्पष्टीकरण देताना भोसले म्हणाला, “मी बॅटने मारलेला दिलीप ढाकणे हा माझ्या मित्राच्या पत्नीची छेड काढत होता. त्याच्याकडे तिचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ होता आणि तो व्हायरल करण्याची धमकी देत होता. त्याने माझ्या मित्राकडून नकोत्या गोष्टी करायला सांगितल्या. मित्राने माझ्याकडे मदत मागितली. मी तेव्हा संतापाच्या भरात ढाकणेला बॅटने मारले.”
पुण्यातील ‘त्या’ प्रकरणानंतर नागपुरातही तसाच प्रकार; 28 वर्षीय तरूणाने तरुणींकडे पाहत…
यासोबतच, जातीय कारणावरून गुन्हा दाखल करण्याच्या चर्चांवरही भोसलेने उत्तर दिले. तो म्हणाला, “माझा मित्र माऊली खेडकर वंजारी समाजातून आहे आणि मी आदिवासी आहे. मग यात जातीय द्वेषाचा मुद्दा कुठून आला?”दरम्यान, बीड पोलिसांनी सतीश भोसलेविरोधात दोन गुन्हे दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. दुसरीकडे, भोसलेने अटकपूर्व जामिनासाठी बीड न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. आता, त्याला जामीन मिळतो की पोलिसांच्या ताब्यात जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.