मुंबईत बेस्टच्या बसची अनेकांना धडक, ३ ठार, १७ गंभीर जखमी
मुंबई : मुंबईतील कुर्ला परिसरात बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. यामध्ये एका भरधाव बेस्टच्या बसने अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून, 17 जण जखमी झाल्याचे माहिती दिली जात आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये गंभीर जखमींची संख्या जास्त असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेदेखील वाचा : दुर्दैवी ! मोहोळमध्ये ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने दोन्ही बहिणींचा मृत्यू
मुंबईतील कुर्ला परिसरातील एलबीएस रोड या ठिकाणी ही घटना घडली आहे. या परिसरामधून ही बस जात असताना बस चालकाने भरधाव बस चालवल्याने अनेकांना धडक बसली. या अपघातात जवळपास 17 जण जखमी झाले आहेत. तसेच 3 जणांचा मृत्यू झाला आहे. या भरधाव बसने रस्त्यावर चालणाऱ्या 10 ते 12 जणांसह वाहनांनाही धडक दिली आहे. अचानकपणे बसने धडक दिल्याने अनेक जण बसच्या कचाट्यात सापडले. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असल्याचे समजते. तर अनेक जण जखमी आहेत. यातील जखमींना तात्काळ सायन आणि कुर्ला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, गंभीज जखमींची संख्याही जास्त असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. या अपघातात काही गाड्यांचा देखील चक्काचूर झाल्याचं सांगितलं जात आहे.
बेस्टचा चालक मद्यधुंद?
या बेस्ट बसचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप देखील आता नागरिकांकडून करण्यात येत आहे. आता या घटनेचा तपास पोलिसांनी सुरु केला असून, पोलिसांनी बस चालकाला अटक केली आहे.
बसचे ब्रेक फेल झाल्याचा अंदाज
बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. बेस्ट बस क्र. (MH-01, EM – 8228) रूट क्र.332 कुर्ला स्थानक येथून अंधेरीकडे जात असताना एलबीएस मार्गावरील आंबेडकर नगर येथे हा अपघात घडला आहे.
30 ते 40 वाहनांना धडक
बसने भरधाव वेगात 100 मीटर अंतरावर 30 ते 40 वाहनांना जोरदार धडक दिली आहे. यानंतर ही बस थेट सोलोमन इमारतीच्या कंपाउंड भिंतींवर जाऊन आदळली आणि थांबली. या घटनेनंतर परिसरातील अनेकांची मोठी गर्दी जमा झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.