
Bhandara News: जिल्ह्यात शेती हा प्रमुख व्यवसाय असला तरी, औद्योगिकीकरण कमी असल्याने श्रमिक वर्गाचा मोठा वर्ग बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे. या श्रमिकांना जीव जोखमीत घालून आणि कडाक्याचे श्रम करून काम करावे लागते. अशा मजुरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत.
भंडारा येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या २ जानेवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार २२६२१ नोंदणीकृत बांधकाम कामगारांना २२ कोटी ७४ लाख ८२,५०० रुपयांचा लाभ देण्यात आला, मंडळाच्या विविध योजनांमुळे जिल्ह्यातील नोंदणीकृत श्रमिकांच्या जीवनात स्थिरता आली आहे. विविध योजनांतर्गत भंडाऱ्यातील २२ हजार ६२१ लाभार्थी कामगारांच्या बँक खात्यात एकूण २२.७४ कोटी डीबीटी प्रणालीद्वारे थेट जमा करण्यात आले.
श्रमिकांचे जीवन सुखकर आणि सुरक्षित व्हावे, हाच आमचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविल्या जाणान्या ३२ विविध योजनांच्या माध्यमातून आम्ही कामगारांच्या कुटुंबांना शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा पुरवत आहोत आतापर्यंत जिल्हयातील २२,६२१ लाभार्थी कामगारांच्या बैंक खात्यात २२.७४ कोटींपेक्षा अधिक रक्कम थेट हस्तांतरित करण्यात आली आहे.
– राजदीप धुर्वे, सहाय्यक कामगार आयुक्त, भंडारा
एकूण प्राप्त अर्जः १ लाख ४७ हजार ४०६
नोंदणीकृत बांधकाम कामगारः १ लाख २ हजार १०४
नूतनीकरण झालेले कामगारः ४० हजार ८९४
सक्रिय (जिवीत) नोंदणीः ३५ हजार ७४७
मंडळामार्फत कामगार व त्यांच्या कुटुंबासाठी ३२ कल्याणकारी योजना राबविल्या जातात. पाल्यांना १ ली ते १२ वीपर्यंत शिष्यवृत्ती, पदवी, पदव्युत्तर शिक्षण व संगणक प्रशिक्षणासाठी मदत. कामगारांच्या शस्त्रक्रिया, प्रसूती, गंभीर आजार आणि नियमित आरोग्य तपासणीसाठी अर्थसहाय्य, मुलीच्या विवाहासाठी मदत आणि कौशल्य वृद्धीसाठी प्रशिक्षण दिले जाते.
विविध योजनांअंतर्गत एकूण २३,८११ लाभार्थ्यांना सुमारे २२.७४ कोटी रुपयांचे लाभ वितरित करण्यात आले. यामध्ये शैक्षणिक सहाय्य योजनेत सर्वाधिक २१,२८३ लाभार्थ्यांना २०.३४ कोटी रुपये, आरोग्य योजनेत ३९१ लाभार्थ्यांना ७३.५५ लाख, सामाजिक सुरक्षा योजनेत १,९६३ लाभार्थ्यांना ९०.४० लाख तर आर्थिक सहाय्य योजनेत १७४ लाभार्थ्यांना ७६.१६ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला.