
ऑक्टोबरमध्ये विजेच्या मागणीत झाली घसरण
मुंबई : ऑक्टोबर महिन्यामध्ये उन्हाचा चांगलाच तडाखा बसत असतो. त्यामुळे विजेच्या मागणीतही वाढ होत असते. मात्र, यावर्षी परिस्थिती जरा वेगळी होती. ऑक्टोबर महिन्यात पावसामुळे हवामान थंडावले असल्याने आता वीज निर्मिती संस्थांना उत्पादन कमी करण्याची वेळ आली आहे. मुसळधार पावसामुळे तापमानात कमालीची घट झाल्याने 28 ऑक्टोबर या दिवशी राज्यभरातील विजेची मागणी 20 हजार 728 मेगावॉटपर्यंत खाली उतरली.
राज्यात सामान्यतः या महिन्यात ‘ऑक्टोबर हिट’मुळे विजेच्या मागणीत वाढ होत असते. याचा परिणाम म्हणून सर्व वीज उत्पादन कंपन्यांना क्षमता वाढवावी लागते. तर वितरण संस्थांना ग्राहकांना सातत्यपूर्ण पुरवठा देण्यासाठी दबाव वाढतो. राज्यांमधील काही जिल्ह्यांत वीजटंचाईमुळे भारनियमन करावे लागते. ऑक्टोबर महिन्यात विजेची मागणी 24 हजार मेगावॉटपर्यंत पोहोचत असे.
दरम्यान, यावर्षी राज्यातील अनेक भागांत कोसळलेल्या सरींमुळे शेती पंपांचा वापर मर्यादित राहिला. तसेच एसीसह इतर वीजप्रवण उपकरणांचे वापर ही कमी झाले. परिणामी मागणी २० ते २१ हजार मेगावॉटच्या स्थिरावली. खालच्या पातळीवर स्थिरावली.
विजेच्या मागणीत घट होण्याची प्रमुख कारणे काय?
अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे तापमान कमी होते आणि विजेची मागणी घटते. गेल्या दोन महिन्यात राज्यभर मुसळधार पाऊस झाल्याने तापमानात कमालीची घट झाली. यंदा ‘ऑक्टोबर हिट’चा परिणाम दिसला नाही. उष्णतेच्या लाटेत वाढ होण्याऐवजी, तापमानात घट झाल्याने विजेची मागणी कमी झाली.
‘यंदा दिवाळीनंतर 2025 च्या 28 ऑक्टोबरला दुपारी 1.55 च्या सुमारास विजेची मागणी 20 हजार 728 मेगावॉटवर खाली आली. यात मुंबईसह परिसरातील मागणी 3 हजार 367 मेगावॉट होती. मागणी अपुरी असल्याने महानिर्मितीसह इतर कंपन्यांनी उत्पादनात कपात केली’.
- निशिकांत राऊत, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी.