
Local Body Election
Local Body Election 2025: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची हालचाल सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोग येत्या बुधवारी पत्रकार परिषद घेणार, असल्याची माहिती समोर आली आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयोगाकडून निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर राज्यभर आचारसंहिता लागू होईल. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तीन टप्प्यांत होणार आहेत. पहिल्या टप्प्यात नगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. राज्यातील राजकीय वातावरण या पार्श्वभूमीवर चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात. मतदारयाद्यांमधील घोळ दुरुस्त होईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली आहे. पण विरोधकांची मागणी मान्य होण्याची शक्यता कमी असल्याचे आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
आयोगाकडून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांत घेण्यासाठी अधिसूचना लवकरच जारी केली जाणार असल्याचेही सांगितले जात आहे. यामुळे राज्यात स्थानिक निवडणुकांच्या हालचालींना वेग आला असून, येत्या काही दिवसांत निवडणूक जाहीरतेची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे.
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका तीन टप्प्यांत घेण्यात येणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. पहिल्या टप्प्यात नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या टप्प्याचा कालावधी २१ दिवसांचा असेल आणि यात २८९ नगरपालिकांचा समावेश असेल.
दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होणार असून, हा कार्यक्रम ३० ते ३५ दिवसांचा असेल. यात ३२ जिल्हा परिषदा आणि ३३१ पंचायत समित्यांचा समावेश आहे. तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात २९ महापालिकांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम सुमारे ३० दिवसांचा असेल.
राज्यातील २८९ नगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा आणि २९ महापालिकांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. नगरपालिकांच्या प्रभाग आणि नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून, महापालिकांच्या आरक्षणाची घोषणाही लवकरच होणार आहे. तसेच मतदारयाद्यांची अंतिम आवृत्तीही प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात राज्यातील २८९ नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येतील. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी किंवा बुधवारी दुपारी राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊन तत्काळ आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.