मंगळवेढा : हुन्नुर येथील श्री बिरोबा व हुलजंती येथील महालिंगराया यांचा भेटीचा सोहळा नुकताच शेकडाे भाविकांच्या उपस्थित पार पडला. दरम्यान या वेळी भंडाऱ्याची उधळण केल्याने भाविक भंडाऱ्यामध्ये न्हाऊन निघाले हाेते.
या साेहळ्याला कर्नाटक राज्य तसेच सांगली, सातारा, सोलापूर ,कोल्हापूर, पुणे आदी जिल्ह्यातील हजारो भाविकांनी या गुरु -शिष्य भेटीच्या सोहळ्यास हजेरी लावली होती. श्री बिरोबा हे धनगर समाजाचे आराध्यदैवत असल्यामुळे या भेट सोहळ्यासाठी मंगळवेढा तालुक्यासह सोलापूर जिल्हा आणि संपुर्ण महाराष्ट्रातून धनगर समाजाचे भाविक भक्त यावेळी उपस्थित होते.
हुन्नुर येथील श्री बिरौबा हे हुलजंती येथुन महालिंगरायाची पालखी घेऊन धावत पळत भाविक हुन्नुर गावाशेजारील ओढ्यात गुरूच्या भेटीसाठी दाखल झाले होते. श्री बिरोबा मंदिरातून ढोल ताश्याच्या गजरात वाजत गाजत बिरोबाची पालखी घेऊन भाविक आले. नंतर महालीगरायाची पालखी ओढ्यातून घेऊन भाविक भेटीच्या मैदानावर आले. भेटीच्या मैदानावर गुरु शिष्यांच्या दोन्ही पालख्या आलेनतर सर्वप्रथम बैलाची भेट झाली व त्यानंतर अनेक भाविकांच्या साक्षीने टाळ्याच्या गजरात खोबरे, लोकर, भंडारा आदींची उधळण करत मुक्तपणे भंडाऱ्यामध्ये न्हाऊन निघत अनेक भाविकांच्या साक्षीने हा गुरु- शिष्य भेट नयनरम्य सोहळा पार पडला.
सर्वांच्या तोंडी बिरोबा महालिंगराया च्या नावानं चांगभलं ऐकायला मिळत होते. हा भेटीचा सोहळा वर्षातून एकदा भरत असतो. गेल्या दहा दशकापासून गुरु व शिष्याची भेटीची परंपरा सुरु आहे. यानंतर देवाला नारळ, भंडारा, पुरण पोळीचा नैवद्य दाखवण्यात आला.