
सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सध्या ऑनलाईनचा जमाना असल्याने बहुतांशजण आपापले व्यवहार ऑनलाईन पध्दतीनेच करण्यास प्राधान्य देतात. परंतु, अद्यापही काहीजण पारंपारिक पध्दतीनेच व्यवहार करणे पसंत करतात. महावितरणने वीज बील (Electricity Bills) भरण्याकरिता ऑनलाईनची सुविधा करण्यात आली आहे. त्या माध्यमातून दर महिन्याला सरासरी ८० टक्के वीज बिलाचा भरणा होतो. तर काहीजण धनादेशाच्या माध्यमातून वीज बील भरतात.
पश्चिम महाराष्ट्रात ग्राहकांनी दिलेले तब्बल ९५० धनादेश न वटता परत गेले आहेत. तर सांगली जिल्ह्यात महावितरणला दिलेले ३० धनादेश वटलेले नाहीत. संबंधितांच्या वीज बिलात पुढील महिन्यात आता विलंब आकार आणि जीएसटी करासह ८५५ रुपयांचा दंड समाविष्ट करण्यात येणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील वीजग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी दिलेल्या धनादेशांपैकी दरमहा सुमारे ९५० ते एक हजार धनादेश वटलेले नाहीत. ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध असली तरी पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येक महिन्यात अद्यापही सुमारे १ लाख ९ हजार वीजग्राहक दरमहा वीजबिलांचा भरणा धनादेशाद्वारे करीत आहेत. मात्र, त्यापैकी दरमहा सुमारे ९०० ते एक हजार ग्राहकांच्या वीजबिलांचे धनादेश वटत नसल्याचे चित्र आहे.
मागील महिन्याचा विचार केल्यास पुणे जिल्हा सरासरी ७०० सोलापूर- ४० सातारा- ३० सांगली- ३० आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये ११० धनादेश वटलेले नाहीत. या सर्व ग्राहकांना प्रत्येक वीजबिलासाठी ७५०/- रुपये बँक ॲडमिनिस्ट्रेशन चार्जेस व त्यावरील १८ टक्के जीएसटी कराचे १३५/- रुपये असे एकूण ८८५/- रुपये आणि विलंब आकार पुढील महिन्याच्या वीजबिलात इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येणार आहे.
एकाच धनादेशाद्वारे अनेक ग्राहक क्रमांकाच्या वीजबिलांचा भरणा केलेला असल्यास प्रत्येक ग्राहक क्रमांकाच्या वीजबिलासाठी दंडात्मक रक्कम लावण्यात येते. यासोबतच धनादेशाद्वारे वीजबिल भरण्याची सोय सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात येते.
धनादेशावर चुकीची तारीख, खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, चुकीचे नाव, खात्यात संबंधीत रक्कम नसणे आदी कारणांवरून धनादेश वटत नसल्याचे महावितरण अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. साहजिकच धनादेश देणाऱ्या वीज ग्राहकांनी धनादेश देताना आवश्यक ती सर्व खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा दंडाचा फटका बसणार हे नक्की आहे.