फोटो सौजन्य - Social Media
दीपक गायकवाड, मोखाडा: अल्बानिया (युरोप) येथे फसवणुकीच्या जाळ्यात अडकलेल्या पालघर जिल्ह्यातील रहिवासी उमेश किशन धोडी यांना तातडीने मायदेशी परत आणण्यासाठी खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची दिल्लीत भेट घेऊन त्वरित हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
उमेश धोडी यांना वडोदरा (गुजरात) येथील एका एजंटमार्फत “जनरल हेल्पर” या पदासाठी अल्बानिया येथे पाठवण्यात आले. मात्र तेथे पोहोचल्यानंतर त्यांच्यावर जबरदस्तीने झाडू मारणे आणि शारीरिक कष्टाची कामे लादण्यात आली. काही काळानंतर कोणतीही वैध कारणे न देता त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. सध्या ते अन्न, निवास आणि आरोग्यसेवा यांसारख्या मूलभूत सुविधा नसलेल्या परिस्थितीत तग धरून आहेत.
या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आणखी एक गंभीर बाब समोर आली असून, स्थानिक एजंटकडून त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. या सर्व घडामोडींची गंभीर दखल घेत खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी परराष्ट्रमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात तत्काळ मदतीची मागणी केली आहे.
त्यांनी सरकारकडे खालील उपाययोजना राबवण्याची विनंती केली आहे:
डॉ. सवरा यांनी स्पष्ट केले की, “हे प्रकरण फक्त एका व्यक्तीच्या जीविताशी संबंधित नाही, तर हे प्रकरण मानवी हक्कांचे उल्लंघन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील फसवणूक दर्शवते. त्यामुळे सरकारने युद्धपातळीवर कार्यवाही करून उमेश धोडी यांचे प्राण व प्रतिष्ठा वाचवावेत.”
या गंभीर प्रकरणात केंद्र सरकार तातडीने सक्रिय होऊन कारवाई करेल, अशी अपेक्षा डॉ. सवरा यांनी व्यक्त केली आहे. हे प्रकरण केवळ उमेश धोडी यांचे नाही, तर विदेशात कामासाठी जाणाऱ्या अनेक भारतीयांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करते.