मुंबई : सीबीडी बेलापूरमध्ये मोठी बातमी समोर आली. शनिवारी (27 जुलै) पहाटे 5 च्या सुमारास नवी मुंबईतील शहाबाज गावात 4 मजली इमारत कोसळली असून ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मनपा अधिकारी आणि पोलीस, NDRF टीम घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्यही सुरू झाले आहे. आतापर्यंत २ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीत 26 कुटुंबे राहत होती. यात एकूण 100 हून अधिक नागरिक असल्याचेेही सांगण्यात येत आहे. अग्निशमन दल, मनपा अधिकारी कर्मचारी JCB च्या सहाय्याने ढिगारा हटवला जात आहे.
दरम्यान इमारतीच्या तळमजल्यावर राहणाऱ्या सलून चालकाला पहाटे पाचच्या दरम्यान जाग आली. इमारत हालत असल्याचे त्याच्या लक्षात येताच त्याने आरडाओरड सुरू केली आणि इमारतीतील काही लोकांना सावध केले, तोपर्यंत आसपासचेे नागरिकही गोळा झाले होते, नागरिकांनी मिळून इमारतीतील काही लोकांना सुखरूप बाहेरही काढले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. पण अद्यापही काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचे सांगितले जात आहे.
नवी मुंबईमहापालिका आयुक्त कैलाश शिंदे म्हणाले, “ही इमारत आज पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान कोसळली. सेक्टर-१९, शाहबाज गावातील ही जी चार मजली इमारत आहे. इमारतीतून ५२ जण सुरक्षित होते. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 2 जणांना बाहेर काढण्यात आले असून आणखी 2 जण अडकले असण्याची शक्यता आहे. एनडीआरएफचे पथक बचावकार्य करत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे ही इमारत 10 वर्षे जुनी आहे, त्याची चौकशी सुरू असून इमारत कोणाच्या मालकीची आहे, त्याच्यावर कारवाई केली जाईल.