नरेश म्हस्के यांच्या खासदारकीला आव्हान
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यात शिवसेना नेते (ठाकरे गट) राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या निवडणुकीतील विजयाला निवडणूक याचिकेतून आव्हान दिले आहे. या निवडणूक याचिकेच्या निमित्ताने जप्त केलेली मतदान यंत्र ही आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा निवडणूक आयोगाच्या ताब्यात देण्याचे आदेश सोमवारी उच्च न्यायालयाने दिले.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वापरण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेल्या अर्जाची दखल घेऊन न्या. रियाझ छागला यांच्या एकलपीठाने ४९१८ बॅलेट युनिट आणि २४५९ कंट्रोल युनिट्स असलेली ईव्हीएम निवडणूक आयोगाच्या तब्यात देण्याचे आदेश दिले. या याचिकेमुळे अनेक ईव्हीएम जिल्हा निवडणूक कार्यालयात अडकून पडले आहेत.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीन सोडवणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद ईसीआयचे वकील अभिजित कुलकर्णी यांनी केला होता. त्यावर या प्रकरणात पुरावा म्हणून ईव्हीएमची गरज होती का? असा प्रश्न न्या. रियाझ छागला यांनी मागील सुनावणीदरम्यान उपस्थित केला होता. त्यावर ईव्हीएम मशीनची आवश्यक नाही, कारण मतमोजणीचा निकाल आधीच ईआसीआयच्या संकेतस्तळावर उपलब्ध आहे.
तसेच याचिका ही याचिकेत जोडलेली कागदपत्र आणि पुराव्यांवर आधारित असल्याचे विचारे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील डायरस खंबाटा यांनी स्पष्ट केले होते.
नरेश म्हस्के यांची निवड रद्द करावी
ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे नवनियुक्त खासदार नरेश म्हस्केंच्या खासदारकीला उबाठा गटाचे नेते राजन विचारे यांनी उच्च न्यायालयात निवडणूक याचिकेतून आव्हान दिले आहे. म्हस्के यांची ठाणे मतदारसंघातून खासदार म्हणून झालेली निवड रद्द करावी आणि मतदारसंघाचे खासदार म्हणून आपली निवड करावी, अशी मागणी विचारे यांनी याचिकेतून केली आहे.