मुंबई: आपले आवडते अभिनेते, खेळाडू, व्यासायिकांची, आपल्या जवळच्या व्यक्तीची प्रेमकहाणी ऐकायला सर्वांनाच आवडते. पण एखाद्या नेत्याची प्रेमकहाणी फार क्वचितच ऐकायला मिळते तेही जर ते स्वत:च सांगणार असतील तर बात ही कुछ और है…एखाद्या नेत्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आपल्याला फार कमी माहिती असते. पण सामाजिक आणि राजकीय जीवनाव्यतिरिक्त त्याचे वैयक्तिक आयुष्यही तितकेच खास असते. अशीच स्टोरी आहे. भाजपचे माजी चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पत्नी अंजली पाटील यांची.
महाराष्ट्र भाजपातील ज्येष्ठ नेते म्हणून आज चंद्रकांत पाटील यांची ओळख आहे. महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्ङणूनही त्यांनी काम पाहिले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी मंत्री म्हणूनही काम केलं आहे. याच चंद्रकांत पाटील यांच्या लग्नाची गोष्ट खास आहे. चंद्रकांत पाटील आणि अंजली पाटील यांनी नुकतीच एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या माझा कट्टा कार्यक्रमात मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या लग्नाची गोष्ट सांगितली आहे.एका कॉमन फ्रेंडमे त्यांचे लग्न जुळवून आणल्याचे त्यांनी या मुलाखतीत सांगितले आहे.
अंजली पाटील म्हणाल्या, ‘ चंद्रकांत पाटील आणि माझी पहिली भेट कधी झाली हे आता फारसे आठवत नाही. मी अकरावीपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करत होते. मला फारसे आठवत नाही, पण तेव्हा चंद्रकांतदादा कदाचित राज्यपातळीवर काम करत असावेत. आम्ही लग्नासाठी 2004 साली भेटलो. आमचा एक कॉमन मित्र आहे. त्याने माझ्याकडे लग्नासाठी चंद्रकांतदादाबद्दल विचारणा केली. पण त्यावेळी माझे ऑडिटचे काम सुरू होते. सप्टेंबरपर्यंत आमचे ऑडिटचे काम चालत असते. त्यामुळे ऑडिट झाल्यानंतर मी चंद्रकांतदादांचा विचार केला. आमच्या कॉमन फ्रेंडने विचारल्यानंतर होकार देण्यासाठी जवळपास दोन-अडीच महिने घेतले असतील.
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘ मी लग्न केलं पाहिजे, असा आग्रह माझे मित्र करायचे. त्यानंतर मी वयाच्या 36 व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अभय बापट नावाचा आमचा एक कॉमन मित्र आहे. अंजलीच्या आईवडिलांना अंजली आणि तिचा भाऊ असे दोनच अपत्य होती. आई वडिलांना सांभाळण्यासाठी अंजली यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यातच अभय बापटने अंजली यांच्याशी मी लग्न करावे असा प्रस्ताव मांडला. अंजली यांच्याशी भेट झाल्यावर, माझ्यावर माझ्या आई वडिलांची जबाबदारी आहे. तशी जबाबदारी तुम्हीही घ्याल का, असा प्रश्न केला. मी पहिल्या भेटीतच हो म्हणून सांगितले. पण तिला विश्वास बसायला थोडा वेळ लागला.
अंजली पाटील सांगतात,”माझ्यासाठी माझ्या आई-बाबांची जबाबदारीमहत्त्वाची होती. त्यामुळे माझ्या प्रमाणेच त्यांची काळजी घेईल असा जोडीदार मिळाला तर लग्न करण्यास हरकत नव्हती. हा मुद्दा मी चंद्रकांत पाटील यांच्यासमोर मांडला. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी ही जबाबदारी पूर्णपणे सांभाळली आहे.
बाबांची प्रकृती खराब असताना त्यांनी दोन महिन्यांत तीन खोल्यांचं घर बांधले. मी त्यांना भेटले तेव्हा मला त्यांच्याबाबत विश्वास वाटला. याचं कारण म्हणजे त्यांनी एखादा शब्द दिला की काहीही झालं तरी ते तो शब्द पाळतातच.त्यानंतरही मी लग्नासाठी वेळ घेतला आणि तो यशस्वी झाला.