भौतिकशास्त्राच्या पेपरलाही अनेक सेंटरवर कॉपी
छत्रपती संभाजीनगर : राज्यात सध्या बारावी बोर्ड परीक्षा सुरु आहे. या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी शिक्षण खात्याकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. कॉपीमुक्त अभियानासाठी सध्या महाराष्ट्र सरकारसह जिल्हा यंत्रणा सुद्धा सज्ज असताना अनेक ठिकाणी बैठे पथक हे काम करत आहेत. जेणेकरून कॉपीमुक्त परीक्षा व्हावी. परंतु या योजनेला खो देण्याचे काम अनेक जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे.
बारावी बोर्ड परीक्षेदरम्यान मंगळवारी परीक्षा केंद्रावर भौतिकशास्त्राचा पेपर लीक होऊन सर्व प्रश्न-उत्तरांची झेरॉक्स प्रत हाती लागली आहे. बारावी परीक्षेदरम्यान केंद्रावर सर्रास कॉपी सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. शहरात शाळेत एक विद्यार्थी बारावीचा पेपर देत असताना त्याला हा प्रकार आढळून आला.
दरम्यान, एका विद्यार्थ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर केंद्रावर मिळालेली झेरॉक्स प्रत दिली. झेरॉक्स कॉपीवर नऊ प्रश्नांची उत्तरे लिहिलेली आढळली. त्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. यावरून प्रश्नसंच बाहेर गेलाच कसा? व त्याची उत्तरे सोडवून झेरॉक्स, सेंटरवरून केंद्रावर आली कशी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
भौतिकशास्त्र, तर्कशास्त्रच्या पेपरला ५७ जणांना पकडले. बारावीच्या परीक्षेत आतापर्यंत पाच विषयांच्या पेपरला छत्रपती संभाजीनगर विभागात तब्ब १०४ कॉपीबहाद्दर पकडले गेले आहेत. कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याने परीक्षेत या विभागाची नाचक्की झाली आहे. भौतिकशास्त्र व तर्कशास्त्र या विषयांच्या पेपरमध्ये ७४ विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. ज्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्वाधिक ५७ विद्यार्थी आहेत.
संभाजीनगर विभागात लक्ष द्यावे लागणार
आता या पुढील विषयांच्या पेपरच्यावेळी छत्रपती संभाजीनगर विभागात कडक लक्ष द्यावे लागणार आहे. राज्य मंडळाने यंदा केलेल्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना गैरप्रकार करण्यास चांगलाच अटकाव बसला असला तरी यामध्ये छत्रपती संभाजीनगर कॉपीत आघाडीवर आहे. तर पुढील पेपर सुरळीत पार पाडण्यासाठी राज्य मंडळाच्या कर्मचाऱ्यांना चांगलीच तयारी करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लाखो विद्यार्थी देत आहेत परीक्षा
राज्यातील ३ हजार ३७३ केंद्रांवर ८ लाख १० हजार ३४८ मुले, ६ लाख ९४ हजार ६५२ मुली, ३७ तृतीयपंथी विद्यार्थी परीक्षा देत आहेत. ११ रोजी परीक्षेला सुरुवात झाली १५ रोजी इंग्रजी व भाषा विषयायांचे पेपर झाले. इंग्रजी वगळता इतर विषयांना कॉपीचे प्रमाण कमी होते. राज्यभरातून इंग्रजीच्या पेपरला ४२ कॉपीबहाद्दर पकडण्यात आले. यातील २६ विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरचे आहेत. हिंदीच्या पेपरला राज्यात १६ विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेले, त्यात. १३ हे छत्रपती संभाजीनगर येथील आहेत.