संभाजीनगरमधील 'या' बड्या नेत्याची ठाकरे गटाला सोडचिठ्ठी; स्थानिक निवडणुकांपूर्वीच शिवसेनेला धक्का
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता तीन ते चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजणार आहे. मागील निवडणुकांत मविआ विरुद्ध महायुती असा रंगतदार सामना पाहायला मिळाला होता. मात्र, यंदा चित्र वेगळे राहण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत बिघाडी होत असल्याचे चित्र आहे. तर महायुतीतील भाजपने स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची भाषा केली आहे.
शिवसेना (शिंदेसेना) मात्र भाजपसोबत लढण्यासाठी आग्रही आहे. अशा गोंधळात येणारी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका कशा पद्धतीने पार पडतात याकडे आता नागरिकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. दोन दिवसांपूर्वीच शिवसेना उबाठाचे नेते खासदार संजय राऊत यांनी स्वतंत्र लढण्याविषयी वक्तव्य केले होते. महाविकास आघाडीत याचे पडसाद उमटले. खासदार राऊत यांच्या या घोषणेनंतर महाविकास आघाडीत बिघाडी झाली का अशी चर्चा सुरु झाली आहे.
वास्तविक, मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढवू असे यातील निष्कर्ष होता. मात्र, याचे पडसाद राज्यातील सर्वच जिल्ह्यात दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाची स्थिती निर्माण होऊ शकते. दरम्यान, संभाजीनगरात उबाठा गटाला गळती लागली. नुकतेच माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करत शिंदे सेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. भविष्यात आणखी कोणकोण भाजपच्या तंबूत दाखल होतेय याची उत्सुकता आहे. यामुळे उबाठा गटाची चिंता वाढली आहे.
शहरात नुकत्याच झालेल्या उबाठा गटाच्या ‘घे भरारी’ मेळाव्यात पक्षनेते चंद्रकांत खैरे यांनी मंचावर लोटांगण घालत एकीकडे कार्यकर्त्यांसह नागरिकांना भावनिक साद घातली. तर दुसरीकडे नंदकुमार घोडेलेंचे नाव न घेता, त्यांच्या दुसऱ्या पायाकडे बघावे लागेल, असा इशाराही दिला. घोडेले यांनीही त्यांना प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून, आपण अशा धमक्यांना घाबरत नसल्याचे प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण होत आहे. राज्यात मुंबईसारखीच संभाजीनगर महापालिका महत्त्वाची समजली जाते. येथे शिवसेनेचे अधिराज्य राहिलेले आहे. ही महापालिका आपल्याकडेच राहावी यासाठी उबाठा कामाला लागली आहे तर दुसरीकडे महायुतीदेखील महापालिकेच्या दृष्टीने नियोजनात व्यस्त झाली आहे.
भाजपने स्वबळावर लढावं; पदाधिकाऱ्यांची इच्छा
मुंबईत महायुतीतील प्रमुख पक्ष भाजपने स्वतंत्र लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, महायुतीने एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे जावे असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. यामुळे महायुतीतही सारे आलबेल आहे का याबाबतही चर्चा सुरु झाली आहे. या सर्वांचा परिणाम संभाजीनगरात दिसून येणार आहे.