Chinchaner Vandan village decided to celebrate Diwali without fireworks.
मेढा : देशभरामध्ये सर्वत्र दिवाळीचा उत्साह आहे. दिव्यांच्या प्रकाशामध्ये आणि आतिषबाजीमध्ये दिवाळी साजरी केली जाते. मात्र सध्याच्या हवामानाच्या स्थितीमुळे फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले जात आहे. यावर आता साताऱ्यातील गावाने स्युत्य निर्णय घेतला आहे. फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे चिंचनेर वंदन गावाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शूरवीर सैनिकांची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार तसेच विविध क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या सातारा तालुक्यातील चिंचनेर वंदन या गावांमध्ये सर्व ग्रामस्थांनी एकमताने फटाके बंदीचा एकमुखी निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
चिंचणेर वंदन गावची लोकसंख्या जवळपास साडेतीन हजारांच्या आसपास असून सर्व ग्रामस्थांच्या एकत्रित सहभागाने विविध सामाजिक, शासकीय,सार्वजनिक उपक्रम गावात राबवले जातात. लोकसहभाग हे गावाचे वैशिष्ट्य असून याच वैशिष्ट्यातून गावाने फटाके बंदीचा निर्णय घेतला आहे. माझी वसुंधरा अभियान 5.0 या अभिनव अभियानात गावाने सहभाग घेतला असून, या ग्रामपंचायतीने नुकतेच पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा देखील केला आहे. तर आत्ता दिवाळीमध्ये फटाके मुक्त दिवाळी करण्याचा मानस सर्व गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
ग्रामसभेत एकमुखी घेण्यात आला निर्णय
नुकत्याच झालेल्या गावच्या ग्रामसभेत फटाके मुक्त व पर्यावरण पूरक सर्व प्रकारचे सण उत्सव साजरा करण्याचा एक समाज हिताचा निर्णय गावाने घेऊन पर्यावरणाचे रक्षण करण्याचे कार्य सर्वांच्या सहकार्याने करण्याचे ग्रामसभेमध्ये निश्चित करण्यात आले. त्यानुसार चिंचणेर वंदन येथे सर्व प्रकारचे सण उत्सव पर्यावरण पूरक साजरे करण्याचे ठरवण्यात आले असून फटाक्यांवर देखील बंदी घालण्यात आलेली आहे. यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून एकाही व्यावसायिकाला फटाके विक्रीस परवानगी देण्यात आलेली नाही.
” शाळा,विद्यालयांमधील विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून देऊन जनजागृती करण्याचे कार्य देखील या निमित्ताने करण्यात आले आहे.याकामी ग्रामपंचायत, विकास सेवा सोसायटी, गावातील विविध संस्था सर्व तरुण मंडळ आजी-माजी पदाधिकारी, जेष्ठ नागरिक, ग्रामस्थ, महिला बचत गट या सर्वांच्या एकत्रित सहभागाने हे अभियान यशस्वी करण्याचे उद्दिष्ट ग्रामपंचायतीने ठेवले आहे.”
संजय यादव, ग्रामविकास अधिकारी चिंचणेर वंदन