Devendra Fadnavis: ; 'AI' च्या मदतीने मंत्रालयाची सुरक्षा भक्कम होणार; फडणवीसांनी दिले 'हे' महत्वाचे आदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील सर्व समाज विकास महामंडळे एका आयटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचा निर्णय सुद्धा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. त्यामुळे सर्व विकास महामंडळाच्या सर्व योजना एका ठिकाणी उपलब्ध होणार आहे. तसेच मंत्रालयाच्या सुरक्षेबाबत देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा बैठक घेत काही महत्वाचे आदेश दिले आहेत.
राज्याच्या अनेक भागातून नागरिक आपली कामे पूर्ण करण्यासाठी मंत्रालयात येत असतात. मंत्रालयात रोज येणाऱ्या नागरिकांची, अधिकाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेवर ताण येतो. मंत्रालयात येणारे नागरिक, अधिकारी यांना सुलभ प्रवेश मिळावा आणि सुरक्षा व्यवस्थेवर ताण येऊ नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्वाचे आदेश दिले आहेत.
मंत्रालयात आज मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मि शुकला बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फळसणकर , प्रधान सचिव अश्विनी भिडे आणि अन्य वरिष्ठ अधिकरी उपस्थित होते. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्देश फडणवीस यांनी दिले.
मंत्रालयात आता फेस आयडीद्वारे प्रवेश मिळणार आहे. ज्या व्यक्तीचे ज्या मजल्यावर काम असेल त्याला तिथेच जाता येणार आहे. अन्य मजल्यावर त्यांना जाता येणार नाही. ज्या विभागात काम तिथेच प्रवेश मिळणार आहे. क्यूआर कोड स्कॅन करूनच मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे. पुढील दोन ते तीन महिन्यात हि सिस्टिम सुरू केली जाणार आहे. मंत्रालयातील प्रत्येक मजल्यावरील सुरक्षा जाळीचे काम पूर्ण करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत. मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक वस्तूची चोख तपासणी करावी. कोणतीही आक्षेपार्ह वस्तू येऊ नये यासाठी काळजी घ्यावी, असे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत.
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय सुरक्षा आढावा बैठक सुरू
या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त व गृह विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित.
🕐 दु. १२.५० वा. |… pic.twitter.com/o2sR04SLQY
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 2, 2025
९६३ शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर गुरुवारी आज (2 जानेवारी) राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात पहिली बैठक झाली. अवघ्या ३० मिनीटात ही बैठकीमध्ये केवळ ३ निर्णय घेण्यात आले. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य खात्याचे मंत्री उपस्थित होते. तसेच संबंधित खात्याचे मंत्रालयीन अधिकारीही उपस्थित होते. राज्यातील एकूण ९६३ शेतकऱ्यांना ४ हजार ८४९ एकर जमीन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा: ४ हजार ८४९ एकर जमीन परत देणार, ९६३ शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय
राज्य सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील 963 शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. याशिवाय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम-220 मध्ये आकारी पड जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा देखील निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.