Devendra Fadnavis On Maratha Reservation: "मला दोष, शिव्या दिल्या तरी..."; मराठा आरक्षणावर फडणवीसांची प्रतिक्रिया
जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले
राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला
मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले भाष्य
Manoj Jarange Patil: गेल्या पाच दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सोडले आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाबाबतचा जीआर काढला आहे. सरकारने जरांगे पाटील यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत. दरम्यान आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
मंत्रिमंडळ उपसमितीने मराठा समाजाच्या हिताचा तोडगा काढला आहे. त्यामुळे जे काही उपोषण सुरू होते ते आता संपवण्यात आले आहे. हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा आमची सुरुवातीपासून तयारी होती. मात्र मनोज जरांगे पाटील यांची सरसकट ही जी मागणी होती ती, त्यामध्ये कायदेशीर अडचणी होत्या. हायकोर्ट व सुप्रीम कोर्टाचे निर्णय बघता सरसकट करणे शक्य नव्हते.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर माध्यमांशी संवाद!
(नागपूर । 2-9-2025)#Maharashtra #Nagpur #MarathaReservation pic.twitter.com/mL3DwIBiir
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 2, 2025
जीआर निघाला आहे. तसेच अन्य मागण्या देखील मंत्रिमंडळ उपसमितीने मान्य केल्या. मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि सर्व सदस्यांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी अभ्यास करून चर्चा करून मार्ग काढला आहे. आम्ही यावर सांविधानिक तोडगा काढू शकलो आहोत, जो कोर्टात देखील टिकेल. मी मंत्रिमंडळ उपसमितीच्या कामावर समाधानी आहे. त्यांनी उत्तम कामे केले आहे. यामध्ये मुंबईकरांना थोडा त्रास सहन करावा लागला, त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो.
सातत्याने राजकारणात टीका सहन करावी लागते. टीका झाली तेव्हा देखील मी विचलित झालो नाही. समाजाला न्याय द्यायचा, दोन समाज एकमेकांसमोर येणार नाहीत , तेढ निर्माण होणार नाही, हेच ध्येय माझ्यासमोर होते. मला दोष, शिव्या दिल्या तरी मी समाजासाठी कालही काम करत होतो, आजही करत आहे आणि उद्याही करत राहणार आहे.
मनोज जरांगे पाटलांनी सोडले उपोषण
मनोज जरांगे पाटील गेले पाच दिवस मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत होते. दरम्यान राज्य सरकारने आरक्षणाचा जीआर काढल्यावर मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सोडले आहे. दरम्यान उपोषण सोडल्यावर जरांगे पाटील यांना अश्रु अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सोडले आहे. त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आरक्षणाची लढाई जिंकल्याचे समाधान पाहायला मिळाले. त्यांनी गुलाल उधळून हा आनंद साजरा केला. तसेच आंदोलकांनी सावकाशपणे आपल्या गावी जाण्याचे आवाहन केले आहे. तसेच रात्री 9 पर्यंत मुंबई रिकामी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.