'मी डॉक्टर नाही, पण मोठं ऑपरेश केलंय'; एकनाथ शिंदेंनी डागली ठाकरेंवर तोफ
विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असून राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आज एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांची मशाल क्रांतीची नसून घराघरात आग लावणारी आहे. अडीच वर्षात त्यांनी केवळ विकासकामांना स्थिगिती देण्याचं काम केलं, असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी केला. धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे महायुतीचे उमेदवार तानाजी सावंत यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
हेही वाचा-Uddhav Thackeray: शिवरायांचा भगवा दरोडेखोरांच्या हाती…; उद्धव ठाकरेंनी महायुतीचे वाभाडे काढले
बाळासाहेब ठाकरे यांचे विचार विकायला निघाले त्यावेळीच आम्ही उठाव करण्याचं धाडस केलं. तानाजी सावंत त्यावेळी माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे होते. बाळासाहेबांनी कमावलेल्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाची आण बान शान नियतीने आपल्यावर सोपवली आहे. तसंच उस्मानाबादच नामकरण धाराशिव करण्याच भाग्य मला मिळालं. पूर्ण बहुमताचं सरकार आणल्यानंतर उस्मानाबादच धाराशिव आणि औरंगाबादच छञपती संभाजीनगर नामकरण करून बाळासाहेबाचं स्वप्न पूर्ण केलं आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली. शिवसेनेचा धनुष्यबाण आपला म्हणणाऱ्यांनी आपली मशालसुद्धा सऱ्याच्या हातात देऊन टाकली आहे. ठाकरेंची मशाल ही क्रांतीची मशाल नाही, ती घराघरात आग लावणारी आहे. गेल्या अडीच अडीच वर्षांच्या काळातील महाविकास आघाडी आणि महायुतीने केलेली कामं जनतेने बघावी. महाविकास आघाडीने अडीच वर्ष फक्त विकासकामांवर स्टे आणण्याचं काम केलं. आमच्या महायुती सरकारने मात्र फक्त राज्याचा विकास केला. परंडा येथील किल्लेदार तानाजी सावंत यांची प्रचारसभा, ही विजयाची सभा आहे. तानाजी सावंत यांचा नाद करायचा नाही.
हेही वाचा-Narendra Modi Dhule Speech: महाविकास आघाडी ही चालक आणि चाके नसलेली गाडी; धुळ्यातून मोदींनी तोफ डागली
परंडा येथील जनतेच्या मनात काय आहे. हे आजच्या गर्दीने ठरवलेलं आहे. हा एकनाथ शिंदे 23 तारखेला परंड्यात फटाके फोडायला येणार आहे. असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांना विजयी करण्याचं आवाहन मतदारांना केलं.परंडा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे राहुल मोटे निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळे परंडात यंदा चुरसीची लढत पहायला मिळणार आहे.
या सभेत एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावतं यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्याचे संकेत दिले आहेत. सभेत बोलताना ते म्हणाले की, तानाजी सावंत यांना तुम्ही आमदार करा, नामदार करायची जबाबदारी माझी, असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी परंडा येथील जाहीर सभेतून दिले. त्यामुळे महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर तानाजी सावंत यांची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.