Photo Credit- Social Media
बुलढाणा: छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा मावळ्यांच्या हाती शोभून दिसतो दरोडेखोरांच्या नाही, अशी घणाघाती टीका करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महायुती आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळकेंच्या प्रचारार्थ आज (8 नोव्हेंबर) बुलढाण्यात उद्धव ठाकरेंनी बोलत होते. तसेच, मागच्या वेळी गद्दारांवर विश्वास ठेवला आणि चूक केली त्यासाठी माफी मागतो असं म्हणत त्यांनी माफीही मागितली.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “तुम्ही सर्वांनी आपल्या जयश्रीताईंना आमदार करा, आपलं बहुमत आल्यावर जालिंदरला आमदार करण्याचं काम माझं असेल, जालिंदरसारखी माणसं हल्ली सापडत नाही. त्यांनी संपूर्ण तयारी केली होती. पण माझा आदेश ऐकला आणि तो थांबला. पण आता मी त्याची जबाबदारी घेतली आहे. मी फसवाफसवी करणार नाही. थोतांड बोलणार नाही. शिवसेना प्रमुखांनी मला सांगितलं होतं. इतर गोष्टी जातील आणि परत येतील. पण डोनाल्ड ट्रम्पही हरले होते पण परत निवडूनही आले. त्यामुळे आपण शब्द दिला की वाट्टेल ते झालं तरी शब्द खाली पडून द्यायचा नाही. यावेळची निवडणूक ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. आपल्या विरोधात सगळे महाराष्ट्र द्रोही आहेत.
हेही वाचा: Narendra Modi Dhule Speech: महाविकास आघाडी ही चालक आणि चाके नसलेली गाडी; धुळ्यातून मोदींनी तोफ डागली
आज जे छत्रपती शिवरायांचा झेंडा घेऊन नाचवत आहेत ते सगळेच शिवरायांचे मावळे नाहीत. गेल्यावेळी आपली चूक झाली. पण मी आज निवडणुकीच्या प्रचारात फिरून पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्या विरोधात गद्दार उभा केला आहे. साहजिकच आहे ती चूक माझी आहे. कारण गेल्यावेळी मीच यांना विश्वास ठेवून तिकीट दिलं होतं. माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही त्या गद्दारांना निवडून दिलं. पण आता ती चूक पुन्हा होणार नाही.
छत्रपती शिवरायांनी मावळे तयार केले होते. शिवरायांचा भगवा झेंडा मावळ्यांच्याच हाती शोभून दिसतो, दरोडेखोरांच्या हातात नाही. चाळीस जणांची टोळी आली आणि आपल्या पक्षावर दरोडा घालून आपला पक्ष चोरून नेला. आता म्हणत आहेत की हा पक्ष आमचा आहे. गद्दारच आहेत ते, खोकेबाज आणि धोकेबाज आहेत. पन्नास खोके आता नॉट ओके. आता त्यांनी एवढं कमावलं आहे की आता त्यांना हरवलं तरी फरक पडत नाही. 50 खोके तर आता त्यांच्यासाठी सुट्टे पैसेच झाले आहेत. असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
हेही वाचा:काँग्रेसचा महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल म्हात्रे यांना जाहीर पाठींबा
भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचींही मला कमाल वाटते, की तुम्ही चोर आणि दरोडेखोरांना घेऊन आमच्यावर कसे काय चालून येता. ज्यावेळी भाजपला महाराष्ट्रात कुणी ओळखतही नव्हतं त्यावेळी आम्ही तुम्हाला साथ दिली. शिवसेना नसती तर नरेंद्र मोदी हेदेखील पंतप्रधान झाले नसते. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नसते. पण तुम्ही हिंदुत्त्वाचा भ्रम निर्णण केला. वर गेल्यावर आम्हालाच लाथा घालू लागले, पण ठीक आहे, आता आम्हीही तुमचं तंगडं धरून तुम्हालाच महाराष्ट्राच्या बाहेर भिरकावून दिलं नाही तर मी छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलणार नाही. असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले,
बाहेरच्या राज्यातून या लोकांना प्रचारासाठी लोकांना आणावे लागत आहे. युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विदर्भात येऊन गेले, बटेंगे तो कटेंगेंचा नारा देऊन गेले. कुणाची हिंमत आहे असं करण्याची, आम्हाला काय शिकवत आहात. असा खडा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. आज महाराष्ट्रातले हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बारा बलुतेदार हे सगळे आमच्या पाठिशी उभे आहेत. पण तुमच्याच महायुतीतले गुलाबी जॅकेटवालेच म्हणाले, बाहेरच्या लोकांनी येऊन आमच्यात लुडबूड करू नये, त्यामुळे आम्हाला शिकवण्याची गरज नाही, असाटोलाही त्यांनी यावेळी लगावला.
हेही वाचा: NFLच्या भरतीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची मुदत; त्वरित अर्ज करा