इस्लामपूर: इस्लामपूर बस स्थानकासमोरील रस्त्यावर सीएनजी वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील सिलेंडर पाईपला अचानक गळती लागल्याने प्रचंड घबराट निर्माण झाली. मंगळवारी दुपारी पावणेतीनच्या दरम्यान हा प्रकार घडला. तब्बल अर्धातास गळती सुरू राहिल्याने मोठ्या प्रमाणावर सीएनजी हवेत मिसळला. संपूर्ण सिलेंडर्स रिकामी झाल्याने परिसरातील वातावरण प्रदूषित झाले.गळती झालेल्या सीएनजीने पेट घेतला असता तर मोठी हानी झाली असती. सीनजी पेटला नसल्याने अनेकांनी सुटेकचा निःश्वास टाकला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ; वाघवाडी फाटा येथून सीएनजी रिफिलींग करून ट्रक क्रं ( एचआर ५५ पी ६१९१ ) हा कलेढोण ( कवठेमहांकाळ) ला निघाला होता. इस्लामपूर बस स्थानकासमोर आल्यावर ट्रक वरील रॅकवर फिट केलेल्या सीनजी सिलेंडरच्या पाईपला अचानक गळती सुरू झाली.जोरदार प्रेशरने सिनजीचे हवेत फवारे उडत होते. मोठा आवाज करत सीनजी मिसळला जात होता. हे पाहून नागरिकांनी आरडाओरडा केली. या आवाजाने चालक आणि सहाय्यक चालकांने गाडी थांबवली. प्रचंड प्रमाणात गॅस गळतीचा आवाज येत असल्याने लीक होणाऱ्या सीएनजी सिलेंडर्सचे स्विच बंद करण्याचे प्रयत्न केले. पण संपूर्ण सीएनजी हवेमध्ये मिसळला गेल्याने सीनजी हवेत मिसळण्याचे प्रेशर हळू हळू कमी होत गेले. दरम्यान काही सतर्क नागरिकांनी पोलीस व अग्निशमन दलाला कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
अचानकपणे सुरू झालेल्या सीनजी गळतीच्या भीतीने इस्लामपूर बस स्थानक परिसरातील नागरिकांची धावाधाव झाली. आजूबाजूला असणाऱ्या हातगाडी व वडापाव व्यवसायिकांनी तातडीने गॅस सिलेंडर बंद केले. मोठ्या प्रेशरने आवाज करत सीनजी हवेत मिसळला जात होता. चालकाने वाघवाडी फाटा येथील रिफिलिंग करणाऱ्या युनिटमध्ये तातडीने फोन करून टेक्निशियन बोलवून घेतले. तोपर्यंत रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नेमके काय झाले अनेकांना समजत नव्हते. जा-ये करणाऱ्या लोकांना याची दाहकता माहित नसल्याने त्यांची गर्दी वाढली होती. पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत संबंधित सीनजी गळती लागलेला ट्रक तातडीने शहराच्या बाहेर वाघवाडी रस्त्याला नेण्यास चालकाला भाग पाडले.
इस्लामपूर नगरपालिकेच्या अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी आल्या होत्या. सीएनजीने पेट घेतला तर मोठा अनर्थ घडेल या भीतीपोटी परिसरातील नागरिकांनी रस्त्यावरून व घटनास्थळापासून दूर जाणे पसंत केले. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वरुटे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप यादव,पोलीस नाईक शरद बावडेकर,पोलीस कॉन्स्टेबल सचिन मोरे व पंकज कांबळे यांनी धाव घेत वाहतुकीचे नियोजन केले. व गळती लागलेला ट्रक तातडीने शहराच्या बाहेर काढला.
लाईट नव्हती म्हणून..!
बस स्थानकाच्या समोर पेठ सांगली रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या गटारींची कामे सुरू आहेत. तसेच बस स्थानकाच्या आवारात काँक्रीटीकरण सुरू असल्याने एकाच प्रवेशद्वारातून एसटीची ये-जा सुरू असते. याच प्रवेशद्वा समोर नेहमीच वाहतुकीची कोंडी असते. तिथेच ट्रक दुर्घटनाग्रस्त होवून सीएनजी मोठ्या प्रमाणात गळती होत होता.
वाहतूक कोंडी नसल्याने काही क्षणात रस्ता व बस स्थानकाचा परिसर निर्मनुष्य झाला. आज मंगळवार असल्याने लोड शेडिंग होते सर्वत्र विद्युत पुरवठा खंडित होता. नाहीतर सीनजीचे फवारे विद्युत तारेवर जात होते. तिथे प्रवाह सुरु असता तर आग लागली असती तर काय झाले असते याची घटनास्थळी चर्चा होती.
गॅस शेगड्या सुरू असणाऱ्या व्यवसायिकांचे धाबे दणाणले..!
गॅस गळती सुरू असतांना हाकेच्या अंतरावर असणाऱ्या खाद्य पदार्थ बनवणाऱ्या हातगाड्या चालकांची धांदल उडाली. इथे हातगाड्यांची ही संख्या अधिक आहे. ही घटना घडली तेव्हा अनेकांच्या गॅस शेगड्या सुरू होत्या. गोंधळ उडाल्यानंतर सर्वच हातगाडी चालकांनी शेगड्या बंद करून सिलेंडर सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी धावाधाव केली. मोठी आग लागू शकते. मोठा धोका होऊ शकते याची जाणीव झाल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी होत्या. दुर्घटनागस्त ट्रक शेजारी रिक्षा थांबा असल्याने तिथे दहा ते बारा रिक्षा थांबून होत्या. रिक्षात बसलेल्या चालकांनी गॅस गळती सुरू होताच गाड्या सोडून सुरक्षित जाणे पसंत केले. सर्वच रिक्षा सीनजीवर असल्याने आग लागून मोठा धोका निर्माण होईल या भीतीने रिक्षाचालक भीतीने गांगरून गेले होते.
चौकट ;
गॅस गळतीचा पक्षी व मुक्या प्राण्यांना त्रास..!
इस्लामपुरात झालेल्या गॅस गळतीचा परिणाम एक किलोमीटर अंतरावर दिसून आला. वाऱ्याच्या झोताने बसस्थानकाच्या पूर्वेकडील बाजूला सीएनजी संपूर्ण गॅसचा वास पसरला होता. बसस्थानक परिसरामध्ये असणाऱ्या झाडांवर वास्तव्यास असणाऱ्या अनेक पक्षांना याचा प्रचंड त्रास झाला. हे पक्षी आकाशात सैरभैर फिरत होते. रस्त्याने जाणाऱ्या मोकाट कुत्र्यांनाही गॅस गळतीचा फटका बसला. अनेक श्वान मूर्च्छित पडली होती.