
मतदार याद्यांचे करण्यात आले प्रभागनिहाय विभाजन
20 नोव्हेंबर रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध
27 नोव्हेंबर पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार
मुंबई: महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन संबंधित महानगरपालिका आयुक्तांच्या स्तरावर करण्यात आले असून, त्याबाबत हरकती व सूचना किंवा काही तक्रारी असल्यास त्या 27 नोव्हेंबर पर्यंत संबंधित महानगरपालिकेत दाखल कराव्यात, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्यांकरिता 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून, त्या दिवशी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत. या मूळ मतदार याद्या भारत निवडणूक आयोगाने तयार केल्या आहेत.
प्रभागनिहाय विभाजन संबंधित महानगरपालिका स्तरावर महानगरपालिका आयुक्तांच्या देखरेखीखाली करण्यात आले आहे. त्यानुसार 20 नोव्हेंबर रोजी संबंधित महानगरपालिकेच्या ठिकाणी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यातील आपले नाव https://mahasecvoterlist.in/ObjectionOnClick/SearchName या संकेतस्थळावर शोधता येईल. त्यावर 27 नोव्हेंबर पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील.
प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे आदि कार्यवाही केली जात नाही. मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुकांसंदर्भात; तसेच मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील हरकती व सूचना महानगरपालिका आयुक्तांकडे दाखल करता येतील, असेही राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
आचारसंहितेचा भंग केल्यास होऊ शकते शिक्षा
भोकरदन नगरपालिकेसह अन्य ठिकाणी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिताही तत्काळ लागू झाली आहे. निवडणूक विभागाकडून आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर शिक्षेची तरतूद करण्यात आली असून धर्म, जात आणि प्रलोभनांवर कडक बंदीही घालण्यात आली आहे. लोकशाही प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी राज्य आयोगाने निवडणूक सक्त अंमलबजावणीच्या सूचना दिल्या असून त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
आचारसंहितेचा भंग केल्यास होऊ शकते शिक्षा! निवडणूक आयोगाकडून सक्त अंमलबजावणीच्या सूचना
दरम्यान, आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी जिल्हा निवडणूक विभागाची विविध पथके कार्यरत असून त्यांची जिल्ह्यातील निवडणूका लागलेल्या ठिकाणी बारकाईने लक्ष आहे. प्रशासनाने घालून दिलेले नियम मोडल्यास संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या काही अतिउत्साही समर्थक, कार्यकत्यांना वेळीच आवर घाला, त्यांना निवडणूक आयोगाच्या नियमांची जाणीव करुन द्या अन्यथा, आचारसंहितेचा भंग झाल्यास त्याप्रकरणी शिक्षाही होऊ शकते हे लक्षात असू द्या, असे म्हणण्याची वेळ आली आहे.