मेधा सोमय्या मानहानी प्रकरणात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना कोर्टाने 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
ऐन निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या मानहानी प्रकरणात राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. 50 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर संजय राऊतांना जामीन मंजूर झाला असून पुढील सुनावणी 31 जानेवारी 2025 ला होणार आहे. मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणात दंडाधिकारी कोर्टाने राऊत यांना दोषी ठरवत 15 दिवसांची कोठडी आणि 25 हजारांचा दंड देखील ठोठावला होता.
माझगांव कोर्टात या प्रकरणावर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीला संजय राऊत स्वत: आपले भाऊ आमदार सुनील राऊत यांच्यासोबत कोर्टात हजर झाले होते. तर किरीट सोमय्या देखील उपस्थित होते.
नेमकं काय आहे प्रकरण?
१५ आणि १६ एप्रिल २०२२ मध्ये शिवसेना ठाकरे गटाचं मुखपत्र सामनात एक वृत्त प्रसिद्ध झालं होतं. त्यात मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयांचं बांधकाम आणि देखभालीत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यात मेधा सोमय्या गुंतल्याच यात म्हटलं होतं.
हे देखील वाचा-Maharashtra Election 2024 : देवेंद्र फडणवीसांनीही घातला गुलाबी जॅकेट, या रंगात नक्की दडलंय तरी काय?, काय म्हणाले एकदा ऐकाच
मेधा सोमय्या यांनी या आरोपांचं खंडन करत संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. आपल्याला हे वृत्त वाचून धक्का बसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेली वक्तव्ये बदनामीकारक आहेत. सर्वसामान्यांमध्ये आपली बदनामी करण्यासाठी अशी विधानं केल्याचा दावाही त्यांनी तक्रारी केला होता. मेधा यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचा पुराव्यांतून स्पष्ट होत असल्याचा निर्वाळा दंडाधिकारी न्यायालयाने दिला होता.२६ सप्टेंबर रोजी कोर्टाने राऊत यांना दोषी ठरवून १५ दिवसांची शिक्षा सुनावली होती.
हे देखील वाचा-Maharashtra Assembly Election : वरळीत होणार हायव्होल्डेज लढत, आदित्य ठाकरेंविरोधात शिंदे गटाचा उमेदवार ठरला?
कोर्टाच्या या निर्णयाविरोधात आव्हान देण्यासाठी राऊत यांची शिक्षा ३० दिवसांसाठी स्थगित करण्यात आली होती. त्यांनी जामिनही मंजूर करण्यात आला होता. मात्र ३० दिवसांची मुदत आज संपत आहे. त्यामुळे संजय राऊत यांना आज जामीन घ्यावा लागला. संजय राऊत कोर्टात कालच्या सुनावणीला स्वतः उपस्थित नव्हते. मेधा सोमेय्या यांच्या वकिलानी हा मुद्दा उपस्थित करत अपील याचिकेला विरोध केला होता. न्यायालयाने संजय राऊत यांना खडेबोल सुनावले होते. विशेष म्हणजे कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही, जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी अपीलकर्ता स्वतः कोर्टात हजर असणं गरजेचं असतं, असा युक्तिवाद मेधा सोमय्या यांच्या वकिलांनी काल केला होता. त्यानंतर आज पुन्हा सुनावणी पार पडली. दरम्यान कोर्टाने 50 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर संजय राऊतांना जामीन मंजूर झाला असून पुढील सुनावणी 31 जानेवारी 2025 ला होणार आहे.