Ajit Pawar's reaction on Baba Siddiqui firing case
मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते “बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेनंतर राजकीय आणि सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर त्यांच्या मुलाच्या झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर हल्ला करण्यात आला. रात्री निर्मल नगर परिसरामध्ये हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला केला. त्यांच्यावर तीन ते चार गोळ्या राऊंड फायर केले. बाबा सिद्दीकी यांना तात्काळ लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्या छातीवर गोळी लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया आल्या आहेत. या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार?
अजित पवार यांच्या पक्षातील नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करत खून करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचं निधन झाल्याचं समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला आहे. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. बाबा सिद्दीकी यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.”
पुढे ते म्हणाले,”या घटनेची सखोल चौकशी करुन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. हल्ल्यामागचा सूत्रधारही शोधण्यात येईल. बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे अल्पसंख्याक बांधवांसाठी लढणारा, सर्वधर्मसमभावासाठी प्रयत्न करणारा एक चांगला नेता आपण गमावला आहे. त्यांचं निधन हे राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं नुकसान आहे. झिशान सिद्दीकी, सिद्दकी कुटुंबिय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे,” अशा भावना अजित पवार यांनी व्यक्त केल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचं निधन झाल्याचं समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला आहे.…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 12, 2024
या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “बाबा सिद्दीकींवर प्राणघातक हल्ला झाला. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यातला एक आरोपी हरियाणाचा आहे. तर दुसरा उत्तर प्रदेशचा आहे. मुंबई पोलीस सक्षमपणे काम करत आहेत. कुणीही आरोपी असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल,” असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.