मुंबई: लोकसभेत बहुचर्चित वक्फ दुरुस्ती विधेयक सादर केले जाणार आहे. सत्ताधारी भाजपने आपली तयारी पूर्ण केली असून, आपल्या खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यास सांगणारा तीन ओळींचा व्हीप जारी करण्यात आला आहे. भाजपचे काही मित्रपक्ष वक्फ विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत साशंक आहेत. सरकारने मित्रपक्षांच्या सूचनांचाही समावेश केला आहे. तर विरोधकांनीही सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे. इंडिया अलायन्समध्ये समाविष्ट असलेले पक्ष संसदेत वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध करतील.
विरोधी पक्षाने वादविवाद आणि मतदानात जोरदार भूमिका घेण्याचे स्पष्ट केले आहे. अशा परिस्थितीत दोन्ही बाजूंमध्ये तीव्र संघर्ष होण्याची शक्यता आहे. सकाळी ९.३० वाजता काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक होणार असून, त्यामध्ये सोनिया गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहतील. या विधेयकावरून मोठा गदारोळ सुरू असून, विशेष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील मुस्लिम नेत्यांचे यावर वेगवेगळे मत आहे. केरळ चर्च संस्थेने सर्व राजकीय पक्षांना वक्फ दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. विधेयक मंजूर झाल्यास, दिल्ली जनता मुस्लिम समिती आनंदोत्सव साजरा करेल.
हे सुरू असतानाच दुसरीकडे या विधेयकावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात वाकयुद्ध सुरू झाले आहे. लोकसभेतील वक्फ विधेयकावरून देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर पोस्ट करत ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला. “वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदेत ! बघू या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार?” असा प्रश्न फडणवीसांनी विचारला आहे.
फडणवीसांच्या या ट्विटर पोस्टला संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे उत्तर देत फडणवीसांवर पलटवार केला आहे. “देवेंद्र जी, वक़्फ़ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्ववाचा काडीमात्र संबध नाही, ही तुमच्या पक्षाची एक खाज आहे गोंधळ निर्माण करण्याची! विषय राहुल गांधींचा , त्यांच्या आजीने अमेरिकेला दम भरला होता; आणि पाकिस्तानचे दोन तुकडे करून फाळणीचा बदला घेतला होता! तुमच्यात हा दम आहे? बोला ” असे लिहीत फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे.
दरम्यान, लोकसभेत आज दुपारी १२ वाजता चर्चा सुरू होईल. विधेयकावर चर्चा करण्यासाठी भाजपला ४ तासांचा वेळ देण्यात आला आहे. एनडीएला एकूण ४ तास ४० मिनिटे वेळ देण्यात आला आहे. विधेयकावर चर्चेसाठी ८ तासांचा वेळ देण्यात आला आहे. तथापि, गरजेनुसार वेळ वाढवता येतो. यावर सभापती ओम बिर्ला निर्णय घेतील. लोकसभेत भाजपच्या वतीने जगदंबिका पाल, अनुराग ठाकूर, निशिकांत दुबे, अभिजित गंगोपाध्याय, कमलजीत सेहरावत, तेजस्वी सूर्या, रविशंकर प्रसाद हे नेते विधेयकाच्या बाजूने बोलणार आहेत.