सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि कृषी खात्यातील घोटाळ्यांप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. संतोष देशमुख यांच्या हत्येचे धक्कादायक फोटो व्हायरल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकूडन दबाव वाढला होता. त्यानंतर आज सकाळपासून नाट्यमय घडामोडींनंतर धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंनी ट्विट करत आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले.
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच,…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 4, 2025
आज विधीमंडळाचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला. त्यांनी स्वतः सागर बंगल्यावर न जाता, आपल्या खासगी सहाय्यक (पीए) प्रशांत जोशी यांच्यामार्फत मंत्रिपदाचा राजीनामा सोपवला.यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर काही वेळातच मुंडे यांचे पीए प्रशांत जोशी सागर बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांकडे त्यांचा राजीनामा सुपूर्त केला.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, नेते प्रफुल पटेल यांच्यासह धनंजय मुंडे देखील उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. याच बैठकीत रात्रीच धनंजय मुंडे यांचा राजीनामा लिहून घेतल्याची माहिती समोर आली आहे.
Dhananjay Munde Resignation: वाढत्या दबावानंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला
संतोष देशमुख यांच्या हत्येचे धक्कादायक फोटो सार्वजनिक झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा करत त्यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिले होते. त्या निर्देशांनुसार आज धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनामा स्वीकृत केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांसमोर येऊन अधिकृत घोषणा केली.