भूम : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड हा सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांना सह आरोपी करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी उपविभागीय अधिकारी भूम यांना सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याशिवाय, भूम शहर बंदची हाकही देण्यात आली.
संतोष देशमुख हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रातील समाज बांधव पेटून उठला आहे, अशी क्रूर हत्या करण्यात आली आहे. मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे, त्यामुळे या हत्या प्रकरणांमध्ये जे-जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी व असे कृत्य करणाऱ्यास पाठीशी घालणाऱ्या धनंजय मुंडे यांना देखील सह आरोपी करावे, अशी मागणी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे.
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या उर्वरीत मारेकरांना त्वरित अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी व मुंडे यांना सह आरोपी करावे, या मागणीसाठी ५ मार्च रोजी भूम शहर बंद ठेवण्यात येणार आहे. हे शहर शांततेच्या मार्गाने बंद करून कुठल्याही परीक्षा-परीक्षार्थी यांना अडचण येणार नाही, अशी खबरदारी घेतली जाईल असे देखील समाज बांधवांच्या वतीने कळवण्यात आले आहे.
हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट पसरली आहे. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये मंगळवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. 11 तालुक्यांमधील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते. तर काही ठिकाणी बंदला हिंसक वळण लागलं. केजमध्ये नागरिकांनी टायर जाळून निषेध व्यक्त केला. देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी करण्यात येत आहे. दुसरीकडे लातूरमध्ये मराठा समाज आक्रमक झाला आहे. धनंजय मुंडे आणि आरोपींचे फोटो जाळून निषेध नोंदवला. आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांच्यावर खंडणीसह हत्येचा गुन्हा दाखल करा, अशी आक्रमक मागणी आंदोलकांनी केली.