
तुम्हीही नियमबाह्य पद्धतीने 'लाडक्या बहिणी'चे पैसे घेतले? तर आता होणार 'ही' कारवाई
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी आणि लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा, यासाठी ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामध्ये अनेकांनी नियमबाह्य पद्धतीने पैसे लाटल्याचे समोर आले आहे. आता त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’त सरकारी कर्मचाऱ्यांनीही डल्ला मारल्याची बाब समोर आली आहे. यात दोषी आढळलेल्या संबंधितावर कारवाई होणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. यात रकमेची वसुली करण्यासह वेतनवाढ रोखण्याचा बडगाही उगारला जाण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हफ्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. महिनाअखेरीस १५०० रुपये जमा होणार असून, राज्यातील अडीच कोटींपेक्षा अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. सध्या
राज्यात ५ हजार सरकारी कर्मचारी, ३ हजार शिक्षक, काही जिल्हा परिषद कर्मचारी आणि काही पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. पात्रतेचे नियम डावलून घेतलेला हा लाभ गंभीर अनियमितता मानली जात असून, संबंधितांवर कठोर कारवाईची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.
e-KYC प्रक्रिया वेगाने सुरु
लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया वेगाने सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. योजनेचा गैरफायदा सरकारी कर्मचाऱ्यांनी आणि काही पुरुषांनी घेतल्याची माहिती यापूर्वीच समोर आली होती. आता ई-केवायसीदरम्यान या शंका अधिक स्पष्ट झाल्या आहेत.
सरकारी नोकरदार पुरुषही लाभार्थी
ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अपात्र लाभार्थीवर कारवाई आणि रकमेची वसुली करण्याचा निर्णय लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लाडकी बहीण योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी असताना सरकारी नोकरदार व पुरुषांपर्यंतही लाभ गेल्याचे वास्तव उघड झाल्याने राज्य सरकारसमोर आव्हान उभे आहे.
हेदेखील वाचा : Ladki Bahin Yojana : वडील आणि पती नसलेल्या लाडक्या बहिणींचा E-KYC चा मार्ग झाला मोकळा; अंगणवाडी सेविका करणार मदत