
चांदोली धरणातून वारणा नदीमध्ये विसर्ग वाढला
शाहुवाडी : चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज सलग चौथ्या दिवशीही अतिवृष्टी कायम असल्याने धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या सांडव्यातुन सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. धरणातून सध्या ८ हजार ८७४ क्युसेक्स इतका विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून नदीला आलेल्या पुरामुळे शित्तूर-आरळा, सोंडोली-चरण हे मोठे पुल पाण्याखाली गेले आहेत.
त्यामुळे परिसरातल्या अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. कालपासून परिसरातला विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. या परिसरातले जनजीवन हे पुरते विस्कळित झाले आहे. नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्यामुळे उखळु, शित्तूर वारूण, शिराळे वारूण, खेडे, सोंडोली परिसरातल्या अनेक गावांतील नदीकाठची ऊस व भात शेती पाण्याखाली गेली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून धरणात सध्या १६ हजार ९९२ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.
सध्या धरणाच्या सांडव्यातून ७ हजार २१६ क्युसेक्स तर वीजनिर्मिती केंद्रातून १ हजार ६५८ क्युसेक्स असे एकुण ८ हजार ८७४ क्यूसेक्स प्रतीसेंकंद पाणी वारणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे धरण प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे. चांदोली धरण क्षेत्रात गेल्या चोवीस तासात १६८ तर ३२ तासांत तब्बल २१८ मिलीमीटर तर आजअखेर १९५३ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद येथील पर्जन्य मापन केंद्रावर झाली आहे. सध्या धरणाची पाणी पातळी ६२२.१५ मिटरवर पोहचली असून धरण सध्या २९.६१ टीएमसी म्हणजेच ८६.०५ टक्के भरले आहे.