महापािलकेत मनसे विरुद्ध अायुक्त
पुणे : महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि मनसेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. यामुळे महापालिकेतील वातावरण तापले होते. हा प्रकार समजल्यानंतर मनसेचे पदाधिकारी महापालिकेत पोचले. तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी येथे दाखल झाले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आयुक्त कार्यालयाचा मजला दणाणून सोडला. आयुक्त मला गुंड म्हणाले असा आरोप शिंदे यांनी केला. तर बैठक सुरु असताना शिंदे हे आले आणि ते आक्रमकपणे माझ्यावर धावून आले असा दावा आयुक्त नवल किशोर राम यांनी केला.
आयुक्तांनी बुधवारी दुपारी आयुक्त कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची स्वच्छतेच्या संदर्भात बैठक आयोजित केली. ही बैठक सुरु असतानाच माजी नगरसेवक किशोर शिंदे आणि पक्षाचे काही पदाधिकारी हे बैठकीच्या सभागृहात गेले. त्यावेळी दोघांत वाद झाला. शिंदे हे आयुक्तांच्या अंगावर धावून गेले असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. तर आयुक्तांनी मला आणि मराठी माणसांना गुंड असे संबोधले, असा आरोप शिंदे यांनी करत, आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केले.
नेमकं काय झालं?
शिंदे हे बैठकीच्या सभागृहात आल्यानंतर आयुक्तांनी त्यांना तुमचे काम काय आहे? असा प्रश्न विचारला. तेव्हा शिंदे यांनी मी माजी नगरसेवक आहे, असे सांगितले. त्यावर आयुक्तांनी पुन्हा प्रश्न विचारल्याने शिंदे हे संतप्त झाले आणि वादाला सुरुवात झाली. त्यावेळी काही अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत शिंदे यांना रोखले. यावेळी आयुक्त राम यांनी ‘आप बाहर निकल जाओ’ असे हिंदीत म्हटल्यावर शिंदे यांनी त्यास आक्षेप घेत तुम्ही महाराष्ट्रात आहात, मराठीत बोला ! अशी मागणी केली.
यातून वाद वाढल्याने ‘मी तुला बाहेर पाठवीन’ अशी शिंदे यांनी धमकी दिली. हा प्रकार झाल्यानंतर शिंदे हे आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यास बसले. तेव्हा आयुक्तांनी शिंदे यांना ‘तू गुंड आहेस, मराठी संस्कृतीला बदनाम करणारे गुंड आहात’ असे शब्द वापरले. यामुळे वातावरण आणखी चिघळले.
राज ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा
झालेल्या प्रकाराबाबत माझे पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्याचा दावा शिंदे यांनी केला. याचवेळी येथे दाखल झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी शिंदे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ‘तुम्ही मला अटक करा, माझ्याविरुद्ध गुन्हा नोंदवा’ अशी मागणी शिंदे यांनी केली. मलाही आयुक्तांविरोधात तक्रार करायची आहे, अशी भूमिका घेत शिंदे हे ठाण मांडून बसले.
पक्षाचे पदाधिकारी दाखल; पोलिस छावणीचे रुप
हा झालेला प्रकार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना समजताच, ते आयुक्त कार्यालयाजवळ दाखल झाले. पक्षाचे नेते बाबू वागसकर, शहर प्रमुख साईनाथ बाबर, रणजित शिरोळे, गणेश भोकरे आदी पदाधिकाऱ्यांनी आयुक्त कार्यालयात जाण्याची परवानगी मागितली. दरम्यान, महापालिकेच्या सुरक्षा यंत्रणांनी इमारतीचे सर्व प्रवेशद्वार बंद केले होते. तसेच आयुक्त कार्यालयाकडे जाणारा जाळीचा दरवाजा आणि लिफ्ट बंद करून टाकली होती. पोलिस बंदोबस्तही बोलाविण्यात आल्याने महापालिकेला छावणीचे स्वरुप आल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.
बैठक सुरु असताना येणं योग्य नाही
‘आम्ही अधिकारी आहोत, बैठक सुरु असताना अशा पद्धतीने येणे योग्य नाही, ही गुंड प्रवृत्ती आहे. मी नागरिकांना भेटत असतो. शिंदे हे ज्या पद्धतीने माझ्या अंगावर आले, त्यावरुन त्यांचा हेतू काहीतरी वेगळा असावा असे मला वाटते. मी त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत’, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.
मी माजी नगरसेवक
‘मी माजी नगरसेवक आहे, आयुक्तांच्या बंगल्यातील साहित्य गायब झाल्याप्रकरणी निवेदन देण्यास आलाे हाेताे. आयुक्त माझ्याशी चुकीच्या पद्धतीने वागले. मला धमकी दिली, आयुक्त कार्यालयातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून घ्यावे. मी चुकीचाे वागलाे असेल तर कारवाई करावी,’ असे माजी नगरसेवक शिंदे यांनी म्हटले आहे.